नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या हाहाकरापासून वाचण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे कृषी व्यतीरिक्त कोणतीच कामे चालू नव्हती ना कोणीती वाहतूक. संपुर्णपणे वाहतूक सरकारने बंद केली होती. परंतु मजुरांचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने आणि अर्थव्यवस्थेला रुळावरती आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून रेल्वे मंत्रालय टप्प्याने रेल्वेवाहतूक सुरू करणार आहे. रेल्वेने १ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली आहे.
सध्या सुरू असलेल्या १५ जोडी एसी रेल्वे आणि श्रमिक रेल्वेंव्यतिरिक्त या वेगळ्या रेल्वे असतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घोषणा केली की, १ जूनपासूनच्या या रेल्वेंची बुकिंग लवकरच सुरू होईल. या रेल्वे रोज धावतील. मार्ग अद्याप ठरलेले नसले तरी सूत्रांनुसार, छोटी शहरे व गावांना यातून जोडले जाईल. अगोदर रेल्वेने ३० जूनपर्यंतची तिकिटे रद्द केली होती. रेल्वेमंत्र्यांनी ट्विटर द्वारे याची माहिती दिली आहे. आगामी काही दिवसांत श्रमिक विशेष रेल्वेंची संख्या वाढवली जाईल. सध्या रोज २०० श्रमिक रेल्वे धावत आहेत.
आतापर्यंत रेल्वेने १,५९५ श्रमिक गाड्यांनी २१ लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या राज्यांत पोहोचवले आहे. रस्त्यांवरून चालत जाणाऱ्या प्रत्येक मजुराला राज्य सरकारांनी जवळच्या स्टेशनवर आणावे. त्यांची नोंदणी करून यादी रेल्वेला द्यावी. जेणेकरून अधिक श्रमिक रेल्वे चालवून या लोकांना त्यांच्या घरी पोहोचवता येईल. मजुरांनीही सध्या ते जेथे आहेत तिथेच थांबावे, रेल्वे त्यांना आपल्या गावी पोहोचवेल. या विशेष रेल्वेंसाठी आता ज्या राज्यात रेल्वे जाणार आहे त्या राज्याच्या मंजुरीची गरज राहणार नसल्याचे ट्विटमध्ये रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.
Published on: 20 May 2020, 04:29 IST