News

वाहून जाणारे पाणी, निचऱ्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात कसे साठविता येईल आणि त्या ओल्याव्याचा उपयोग पीक उत्पादन वाढीसाठी कसा करता येईल, हा कोरडवाहू शेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे.

Updated on 17 October, 2023 11:17 AM IST

डॉ.आदिनाथ ताकटे

कोरडवाहू शेतीत “ओल तसे मोल” या उक्तीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो.एकूण पडणाऱ्या पावसापैकी १० ते २० % पाणी जमिनीवरून वाहून जाते.बाकीच्या पाण्यापैकी १० % पाणी निचऱ्या द्वारे व ६० ते ७० % बाष्पीभवनाद्वारे निघून जाते. जमिनीत त्यामुळे सुमारे १० % पाणी उपलब्ध राहते.

वाहून जाणारे पाणी, निचऱ्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात कसे साठविता येईल आणि त्या ओल्याव्याचा उपयोग पीक उत्पादन वाढीसाठी कसा करता येईल, हा कोरडवाहू शेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून कोरडवाहू शेती संशोधन केंद्र,सोलापूर येथे त्या दृष्टीने सखोल अभ्यास करण्यात आला आणि काही महत्वाच्या तंत्राचा शेतीमध्ये अवलंब करण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने बांधबंदिस्ती,आंतरबांध व्यवस्थापन,उतारास आडवी मशागत करणे,कोळपणी करणे, आच्छादनाचा वापर,शेततळी,वनस्पतींचा बांधासारखा वापर ही महत्वाची तंत्र आहेत.

जमिनीत ओल टिकवून ठेवण्याच्या उपायाआधी जमिनीतील ओल कशी कमी होते हे पहावे.जमिनीत साठवून राहिलेली ओल पिकांनी वापरणे, पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाणे,भेगा पडल्यामुळे त्यातून बाष्पीभवन होणे, तणावाटे ओल नष्ट होणे या चार मार्गाने ओल कमी होते. त्यातील पिकाच्या प्रत्यक्ष वाढीसाठी अतिशय कमी प्रमाणात ओल लागते. बहुतांशी (सुमारे ६० टक्के) ओल ही बाष्पीभवनामुळे उडून जाते.वरील उल्लेख केलेल्या मार्गाने कमी होणाऱ्या ओलीचा बंदोबस्त त्यावर केलेल्या उपायाने होतो.

एक कोळपणी आणि अर्धे पाणी
पिक वाढताना त्याबरोबर तण वाढत असते.हे तण पाणी अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करते.पिक उगवून आल्यावर त्यात ठराविक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवने होय. तणामुळे कमी होणारी ओल, तणांचा बंदोबस्त केल्याने राखली जाते.याशिवाय माती हलवून ढिली केल्याने जमिनीच्या पृष्टभागावर एक पोकळ थर तयार होतो.त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. यामुळे ओल टिकवून धरण्यामध्ये कोळपणीचा फार मोठा वाटा आहे.

रब्बी हंगामात तर कोळपणीचा फार मोठ सहभाग आहे. ग्रामीण भागात “एक कोळपणी आणि अर्धे पाणी “ अशी म्हण आहे. म्हणजे एकदा कोळपणी केली तर जवळ जवळ पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. या तत्वांचा अवलंब करून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारी करिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे.पहिली कोळपणी पीक तीन आठवड्याचे झाले असता फटीच्या कोळप्याने करावी.त्यामुळे वाढणारे तण नष्ट करून त्या वाटे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.

दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासेच्या कोळप्याने करावी.त्यावेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सुक्ष्म भेगा पडू लागलेल्या असतात त्या कोळपणी मुळे बंद होतात.त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंद होते.हा मातीचा हलका थर जो तयार होतो त्याला इंग्रजीमध्ये डष्ट मल्च (Dust Mulch) असे म्हणतात.

तिसरी कोळपणी पीक आठ आठवड्याचे झाले असता करावी. त्यावेळी कोळपणी करण्यासाठी दातेरी कोळपे वापरण्याची शिफारस आहे. जमिन टणक झाल्याने फासाचे कोळपे नीट चालत नाही.त्याकरिता दातेरी कोळपे वापरले असता ते मातीत व्यवस्थित घुसून माती ढिली करते आणि त्यामुळे भेगा बुजविल्या जातात. त्यावेळी जमिनीत ओल फार कमी असेल त्यावेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते.

रब्बी ज्वारीस द्या तीन कोळपण्या : ३ रया , ५ व्या आणि ८ व्या आठवड्यात
पहिली कोळपणी- तिसऱ्या आठवड्यात- फटीच्या कोळप्याने
दुसरी कोळपणी- पाचव्या आठवड्यात- पासेच्या कोळप्याने
तिसरी कोळपणी- आठव्या आठवड्यात- दातेरी कोळप्याने

कोरडवाहू रबी ज्वारी तयार होण्यास साधारणपणे १८० पासून २८० मि.मी. ओल लागते. त्यापैकी ४० टक्के ओल पीक फुलोऱ्यात येण्यापासून तयार होण्याच्या अवस्थेत लागते म्हणून प्रयत्न पूर्वक ओल साठविण्याचे उपाय करावे लागतात.
आंतरमशागती करिता खुरपणी देखील अपेक्षित आहे.परंतु सुरुवातीस ज्यावेळी जमिन मऊ आहे आणि तण वाढत आहे,त्यावेळी या खुरपणीचा लाभ होतो. परंतु बैल कोळपे चालविण्याने खोलवर मशागत करता येते आणि जमिन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो. आंतरमशागतीच म्हणजे पीक उगवून आले असता त्याच्या दोन ओळीत केलेली मशागत.त्यात काही प्रमाणात विरळणी देखील करता येईल.मर्यादेपेक्षा ज्यादा असलेली रोपे काढून टाकणे हा पण एक ओलावा टिकविण्याचा उपाय आहे.

रब्बी ज्वारीस पाणी व्यवस्थापन:
१) ज्वारी हे कोरडवाहू पीक म्हणून ओळखले जाते. या पिकास तयार होण्यासाठी ११०ते १२० दिवस लागत असल्याने मोठया प्रमाणात धान्य व कडब्याचे उत्पादन घेण्यासाठी या पिकाला पाण्याची गरज असते.
२) बागायती ज्वारीस दिलेल्या पाण्यापैकी ७० टक्के पाणी पहिल्या ३० से.मी. जमिनीच्या थरातून ,१६ टक्के पाणी दुसऱ्या थरातून,९ टक्के पाणी तिसऱ्या थरातून तर उरलेले ५ टक्के पाणी चोथ्याथरातून पीक घेत असते. पहिल्या ३० से.मी. थरात ६० टक्के पेक्षा जास्त मुळे असल्याने या 3) थरातून मोठया प्रमाणात पाण्याची गरज भागवली जाते.
३) बागायती रब्बी ज्वारीस पीक वाढीच्या महत्वाच्या चार अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते.मात्र भारी,काळ्या खोल जमिनीत पहिल्या तीन अवस्थेतच पाणी दयावे.

रब्बी ज्वारीस पाणी देण्याच्या अवस्था
ज्वारी पिकाचा जोमदार वाढीचा काळ - पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी
पीक पोटरीत असतांना- पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी
पीक फुलोऱ्यात असतांना- पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी
कणसात दाणे भरण्याचा काळ- पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी

१) कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असतांना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असतांना ५० ते ५५ दिवसांनी दयावे.
२) दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी दयावे.
३) बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असतांना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी आणि कणसात दाणे भरतांना ९० ते ९५ दिवसांनी दयावे.
४) भारी जमिनीत ज्वारीला चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.

लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो. ९४०४०३२३८९

English Summary: Rabbi season update a herd of rabbi and half a water planA herd of rabbi and half a water plan
Published on: 17 October 2023, 11:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)