डॉ. आदिनाथ ताकटे
सध्या बहुताश शेतकऱ्यांची ज्वारीची पिके पोटरीत तर काहींची फुलोऱ्यात आहे.ज्वारी पोटरीत आल्यापासून दाणे भरण्यापर्यंतच्या काळात जास्त ओलाव्याची गरज असते.या काळात ओलावा कमी पडल्यास पीक उत्पादनात फारच घट येते.
साधारणपणे ज्वारीची पेरणी केल्यानंतर ५० ते ५५ दिवसांनी पीक पोटरीत येते.यावेळी कणीस ताटातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत असते.पिकांची वाढ शेवटच्या पानापर्यंत झालेली दिसून येते.अशा वेळी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय असेल त्यांनी पाणी दयावे.पाणी मिळाल्याने ज्वारी निसवण्याची प्रक्रिया पूर्ण होते.अन्नद्रव्य ताटातून कणसात जाण्यासाठी मदत होते आणि कणसांचा आकार मोठया होण्यास मदत होते.
कोरडवाहू ज्वारी पिकाची उत्पादनक्षमता ही प्रामुख्याने जमिनीतील साठविलेल्या ओल्याव्यावरच अवलंबून असते.जमिनीवरच्या थरातील पाणी बाष्पीभवनामुळे उडून गेल्यास जमिनीस भेगा पडतात.ज्वारीची पेरणी केल्यानंतर पाऊस न झाल्यास ३० ते ३५ दिवसांनी जमिनीस भेगा पडण्यास सुरुवात होते.सद्य परिस्थितीत राज्यात बहुतेक पिके ही पोटरी अवस्थेत तर काही फुलोऱ्यात आहेत आणि बहुतांश जमिनीस मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत.पोटरी अवस्थेत असणाऱ्या पिकास शेतकरी बंधूनी दातेरी कोळप्याने कोळपणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
यावेळी टणक झालेल्या जमिनीवरून कोळपे ओढणे अवघड जाते.दातेरी कोळप्याच्या दातरयाचा कोन कोळपे ओढण्यास सोपा जाईल असा असावा.दातेरी कोळप्यामुळे जमिनीवरील भेगा बुजण्यास काही प्रमाणात मदत होते आणि या कोळपणीचा उपयोग ज्वारीच्या फुलोरयास मदत होईल.नंतर पडणाऱ्या थंडीमुळे दाणे भरण्याची अवस्था पूर्ण होते.एकंदरीत ज्वारीच्या पिकास तिसऱ्या,पाचव्या आणि आठव्या आठवड्यातील कोळपणीमुळे ज्वारीचे पीक हाती येण्यास हमखास यश येते.
बागायती ज्वारीस दिलेल्या पाण्यापैकी ७० टक्के पाणी पहिल्या ३० से.मी. जमिनीच्या थरातून ,१६ टक्के पाणी दुसऱ्या थरातून,९ टक्के पाणी तिसऱ्या थरातून तर उरलेले ५ टक्के पाणी चोथ्याथरातून पीक घेत असते. पहिल्या ३० से.मी. थरात ६० टक्के पेक्षा जास्त मुळे असल्याने या थरातून मोठया प्रमाणात पाण्याची गरज भागवली जाते.
बागायती रब्बी ज्वारीस पीक वाढीच्या महत्वाच्या चार अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते.मात्र भारी,काळ्या खोल जमिनीत पहिल्या तीन अवस्थेतच पाणी दयावे.
रब्बी ज्वारीस पाणी देण्याच्या अवस्था
ज्वारी पिकाचा जोमदार वाढीचा काळ : पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी
पीक पोटरीत असतांना : पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी
पीक फुलोऱ्यात असतांना : पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी
कणसात दाणे भरण्याचा काळ : पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी
सर्वसाधारणपणे ७०-७५ दिवसात ज्वारी फुलोऱ्यात येते.या अवस्थेत पाणी मिळाल्याने कणसात दाणे भरण्यास मदत होते आणि कणसाचे वजन वाढून एकूण उत्पादन वाढते.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल त्यांनी ज्वारीच्या पिकास पाणी दयावे.
ज्वारीची पेरणी झाल्यानंतर ९०-९५ दिवसात दाणे चिकाच्या अवस्थेत असतात.पिकास पाण्याची गरज असल्यास चौथे पाणी दयावे.हलक्या व मध्यम जमिनीतील ज्वारीस या पाण्याची गरज भासते.भारी जमिनीत ओल धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते.तसेच या अवस्थेत काळ्या भारी जमिनीस भेगा पडलेल्या असतात.भेगाळलेल्या जमिनीस पिकाला पाणी देणे मुश्किल होते आणि गरजेपेक्षा जास्त पाणी दयावे लागते आणि ज्वारी लोळण्याचे प्रमाण वाढते.भारी जमिनीत तीन पाणी दिले असता मिळणारे उत्पादन,चार पाण्याच्या उत्पादनाच्या जवळपास मिळते.
कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धत फायदेशीर दिसून आली आहे.कमी पाणी उपलब्ध असल्यास तुषार सिंचनाने पीक वाचविता येते.मात्र एक पाणी उपलब्ध असल्यास पेरणीनंतर २८-३० दिवसांनी किंवा ५०-५५ दिवसांनी पाणी दिल्यास ज्वारीची वाढ चांगली होऊन हमखास उत्पादन मिळू शकते.दोन पाणी उपलब्ध असल्यास पहिले पाणी २८-३० व दुसरे पाणी ५०-५५ दिवसांनी दयावे.याप्रमाणे संरक्षित पाणी देल्यास ज्वारीच्या उत्पादनात २५-३० टक्क्यांनी वाढ होते.
कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असतांना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असतांना ५० ते ५५ दिवसांनी दयावे.
दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी दयावे.
बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असतांना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी आणि कणसात दाणे भरतांना ९० ते ९५ दिवसांनी दयावे.
भारी जमिनीत ज्वारीला चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.
लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे,मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ ,राहुरी मो.९४०४०३२३८९
Published on: 20 November 2023, 10:04 IST