नवी दिल्ली: भारताच्या पीएसएलव्ही-सी45 या प्रक्षेपण यानाने आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एमिसॅट आणि अन्य 28 आंतरराष्ट्रीय उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
एमिसॅट उपग्रहाचे वजन सुमारे 436 किलो असून, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मूल्य मापनासाठी त्याचा वापर होईल. अन्य 28 उपग्रहांचे वजन 220 किलो असून, अमेरिकेचे 24, लिथूआनियाचे 2, स्पेन आणि स्वित्झर्लंडचा प्रत्येकी एक उपग्रहाचा यात समावेश आहे.
या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अध्यक्ष डॉ. के.सिवन यांनी या मोहिमेत सहभागी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.पीएसएलव्हीने आतापर्यंत 46 राष्ट्रीय उपग्रह, विद्यापीठांचे 10 उपग्रह आणि 297 आंतरराष्ट्रीय उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. मे 2019 मधे पीएसएलव्ही-सी46 हे प्रक्षेपक यान रिसॅट-2व्ही उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे.
Published on: 02 April 2019, 07:41 IST