News

राज्यातील पायाभूत विकासास चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. उद्योगांना प्रोत्साहन देणारी योजना, घरकुल उद्दिष्टे, तसेच शैक्षणिक मदतीची नवी पावले राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरतील.

Updated on 11 March, 2025 11:25 AM IST

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज सादर केलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनकल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले. त्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करत, राज्याच्या गोरगरीब, शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महायुती सरकारने केलेल्या भरीव तरतुदींचा गौरव केला.

आमदार अमोल खताळ म्हणाले, “हा अर्थसंकल्प राज्यातील ग्रामीण भागाचा विकास, शेतकरी कल्याण, महिला सशक्तीकरण, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नवी दिशा देणारा आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, सौर ऊर्जा योजना, महिलांसाठी सशक्तीकरण योजनांमध्ये वाढ, तसेच तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी भरीव तरतूद केली आहे. यामुळे राज्यातील अनेक वंचित घटकांना आर्थिक लाभ होईल.”

त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील पायाभूत विकासास चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. उद्योगांना प्रोत्साहन देणारी योजना, घरकुल उद्दिष्टे, तसेच शैक्षणिक मदतीची नवी पावले राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरतील.

आमदार खताळ यांनी अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे अभिनंदन करत,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व   उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “या अर्थसंकल्पात  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारे आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सुधारणा घडवणारे निर्णय घेतले आहेत. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरेल.”

यावेळी, आमदार अमोल खताळ यांनी या लोककल्याणकारी अर्थसंकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारला शुभेच्छा दिल्या.

English Summary: Provision of loan waiver for farmers, solar energy schemes in budget Information about MLA Amol Khatal
Published on: 11 March 2025, 11:18 IST