सिंधुदुर्ग: कोकण किनारपट्टीचा व त्या अनुषंगाने कोकण वासियांच्या विकासासाठी उपयुक्त असे सागरी संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे उभारण्यात येणार आहे. या सागरी संशोधन केंद्रासाठी वेंगुर्ल्यातील कॅम्प परिसरातील 4 एकर जागा देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सिंधु स्वाध्याय संस्थेअंतर्गत सागरी संशोधन केंद्राच्या उभारणीबाबत वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र येथे आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते.
या बैठकीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, समन्वयक श्री.दळवी, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप, वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, कुडाळचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, कणकवलीच्या प्रांताधिकारी निता सावंत, वेंगुर्ल्याचे तहसिलदार शरद गोसावी, सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, वेंगुर्ल्याचे मुख्याधिकारी वैभव साबळे, मत्सव्यवसाय, खार भूमी, एमटीडीसी व बंदर खात्याचे कर्मचारी, कौशल्य विकास उद्योजक मनोज अय्यर, वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे श्री. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
वेंगुर्ला कॅम्प येथे शिक्षण विभागासाठी राखीव असलेल्या चार एकर जागेवर हे संशोधन केंद्र उभारणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले की, या जागेशिवाय या संशोधन केंद्रास सागर किनारा किंवा खाडी किनाऱ्यावर आणखी जागा लागणार आहे. त्यासाठी नवाबाग, मांडवी किनारा किंवा मांडवी जेटी जवळची जागा प्रस्तावित आहे. याविषयीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. या जागांचे सर्वेक्षण सुरू करुन त्याचे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत. या संशोधन केंद्राचा फायदा विद्यार्थ्यांसोबतच मच्छिमार बांधवांनाही होणार आहे. नौकानयन, मच्छिमारी, सागरी पर्यटन, पर्यावरण, शाश्वत विकास या विषयी छोटे छोटे प्रशिक्षण वर्ग या केंद्रामध्ये सुरू होणार आहेत. त्याचा फायदा मच्छिमारांना होणार आहे. या प्रकारच्या प्रशिक्षणामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
तसेच झाराप येथे मुंबई विद्यापीठातर्फे कौशल्य विकास केंद्र स्थापन होणार आहे. त्यामध्ये गारमेंट, तसेच नर्सिंग सहायकांचे प्रशिक्षणही अंतर्गभूत असणार आहे. या नर्सिंग सहाय्यकांना सध्या जपान, अमेरिकेसारख्या देशांमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींना मोठ्या प्रमणावर रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. काजू बोंडापासून पेयाची निर्मिती, निरा टिकवण्यासाठीचे संशोधन व रुरल इन्कुबेटर याची जबाबदारी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राकडे सोपवण्यात आली आहे. तसेच यंदाच्या वर्षी आंब्याचे पीक भरपूर येणार आहे. त्यामुळे आंबा साठवणूक, पल्पची निर्मिती यासाठीही वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी या बैठकीमध्ये दिल्या.
वेंगुर्ला कॅम्प येथे उभारणार स्कुबा डायव्हिंगचे केंद्र
वेंगुर्ला येथील कॅम्प परिसरामध्ये एमटीडीसीच्या माध्यमातून स्कुबा डायव्हिंगचे केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या केंद्राच्या माध्यमातून वेंगुर्ला येथील पर्यटनास चालना मिळणार आहे. तसेच सबमरीन साठीचे आंतरराष्ट्रीय टेंडर येत्या 15 दिवसात निघणार असून, सागरी संशोधन केंद्र, स्कुबा डायव्हिंग केंद्र आणि पाणबुडी असे हे सर्व प्रकल्प लवकरच मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सागरी संशोधन केंद्रासाठी लागणाऱ्या किनाऱ्यावरील जागेची पाहणीही पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू श्री. पेडणेकर यांच्या चमुसह केली. जागे विषयी सविस्तर चर्चाही करण्यात आली. या बैठकीमध्येच खान निधीच्या तरतूदीं विषयी ही सविस्तर चर्चा करण्यात आली. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग व शिरोडा उप जिल्हा रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी 83 लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यास मंजूरी देण्या विषयीही पालकमंत्री यांनी सूचना केल्या. याशिवाय आरोग्य विभागास लागणाऱ्या इतर सामग्रीच्या खरेदीसाठी आणखी एक कोटी 75 लाख रुपयांनाही मंजूरी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
Published on: 15 January 2019, 06:09 IST