चिखली- कृषी विभागाच्या आवहानानुसार अनुदानीत बियाण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. परंतु आजही असंख्य शेतकरी बियाणे पासून वंचीत असल्याने ऑनलाइन अर्ज करुन प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनां अनुदानीत बियाणे देण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी कृषी आयुक्त यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
तर कृषी विभागाने बियाण्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे. चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचे बियाणे बाबतच्या समस्या सोडवण्यात याव्यात या मागण्यांसाठी शेतकऱ्यांसह स्वाभिमानी व शेतकरी संघटनेकडून ७जुनला कृषी विभागात ठिय्या आंदोलनही करण्यात आले.
राज्य शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षका अंतर्गत बियाणे घटकाचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेव्दारे सोयाबीन,उडीद,मुंग व इतर बियाणे उपलब्ध करुण देण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी कडक लॉकडाऊनच्या काळात महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केले होते. तर याची लाभार्थी निवड आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आली होती.
यामधे चिखली तालुक्यातील ९८९ शेतकर्यापैकी मोजकेच म्हणजे सोयाबीनसाठी २७७ शेतकऱ्यांची निवड झाली त्यांना परमीट सुध्दा कृषी विभागाकडून वाटप करण्यात आले आहे. तर महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज केलेले तालुक्यातील ६३५ शेतकरी आजही बियाणे पासून वंचीत राहले आहेत.तर अर्ज केलेले व न केलेले शेतकरी बियाण्यांच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.मागील वर्षी बोगस बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. तर यावर्षी तसेच बोगस बियाणे दिले जाऊ नये,म्हणून शेतकरी अनुदानीत व प्रमाणीत बियाणे मिळावे यासाठी धडपड करतांना दिसत आहेत.तरीसुद्धा बियाणे मिळत नसल्याने शेतकरी नाइलाजस्तव खासगी कंपण्याकडून बियाणे खरेदी करत आहेत.
खासगी कंपन्यांकडील हे बियाणे उगवेल की नाही याची कसलीही शाश्वती नाही.तर हे बियाणे जादा दराने मिळत असल्याने ऑनलाइन अर्ज करुण प्रतिक्षेत असलेल्या चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानीत सोयाबीन बियाणे उपलब्ध करुन देण्यात यावे, शेतकरी गटातील शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे बियाणे देण्यात यावे,अशी मागणी कृषीमंत्री,पालकमंत्री,कृषी आयुक्त यांच्याकडे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य तथा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी पत्राव्दारे केली आहे.
तर या काळात कृषी सहाय्यकांना शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या सुचना कराव्यात व शेतकऱ्यांना त्रास होऊ नये,यासाठी उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी देखील शेतकऱ्यांसह स्वाभिमानी संघटना व शेतकरी संघटने कडून तालुका कृषी अधिकारी श्री शिंदे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी विनायक सरनाईक,नितिन राजपुत,संतोष शेळके,रविराज टाले,शेषराव शेळके,पवण डुकरे,दिलीप डुकरे,यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.
प्रतिनिधी गोपाल उगले.
Published on: 14 June 2021, 07:14 IST