मुंबई : राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने काटेकोरपणे पालन करावे व त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या. कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीच्या बैठकीचे आज दादर शिवाजी पार्क येथील कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव साळवी सभागृहात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनचे सर्वश्री उपाध्यक्ष, आमदार भाई जगताप, माजी आमदार अमरसिंह पंडित, दिनकर पाटील, रा. उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई, असोसिएशनचे आजीव सदस्य तथा उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांच्या रकमा वाढविण्यात आल्या आहेत. खेळांना महत्व प्राप्त व्हावे यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. ग्रामीण भागात कबड्डी जास्त रूजली आणि वाढली असल्याने आमदार निधी, जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जातो. कबड्डी खेळाला सुवर्ण दिवस आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रीय संहितेनुसार कार्यकारिणी निवडणूक घेण्यात यावी. स्पोर्ट्स कोडचे पालन करण्यात यावे. 21 जून रोजी नव्याने होणाऱ्या कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून, 19 जून ही जिल्हानिहाय मतदारांची नावे स्वीकारण्याची अंतिम तारीख असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: 19 June 2024, 12:18 IST