News

विदर्भातील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील उद्योजकांना येत असलेल्या अडचणीबाबत उद्योजकांच्या प्रतिनिधींनी माहिती दिली. या भागात रस्ते, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, विविध कर, जिल्हा उद्योग मित्र समितीच्या धर्तीवर विभागीय समिती गठित व्हावी आणि अतिक्रमणासह विविध मागण्या व समस्याविषयी या प्रतिनिधींनी मत मांडली.

Updated on 10 April, 2025 5:36 PM IST

नागपूर : औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांची आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना केले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वृक्ष लागवडीचे नियोजन करण्याचे सांगितले. उद्योग क्षेत्राच्या मागण्यांबाबत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास दर्शविला.

विभागीय आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयाच्या सभागृहात विदर्भ विभागातील औद्योगिक संघटच्या पदाधिकाऱ्यांची  विविध विषयांवर बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजूसिंह पवार, नागपूर विभागाचे उद्योग सहसंचालक  गजेंद्र भारती, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ नागपूर  प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे, हिंगणा एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष पी.मोहन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर मालवीय, फेडरेशन ऑफ इंडस्ट्री असोसिएशन विदर्भ तथा एमआयडीसी असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष रुगटा लघु उद्योग भरतीचे कौस्तुभ जोळगेकर यांच्यासह औद्योगिक संघटनेचे एकूण 21 पदाधिकारी उपस्थित होते.

विदर्भातील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील उद्योजकांना येत असलेल्या अडचणीबाबत उद्योजकांच्या प्रतिनिधींनी माहिती दिली. या भागात रस्ते, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, विविध कर, जिल्हा उद्योग मित्र समितीच्या धर्तीवर विभागीय समिती गठित व्हावी आणि अतिक्रमणासह विविध मागण्या व समस्याविषयी या प्रतिनिधींनी मत मांडली. या समस्या सोडविण्यासाठी यावेळी संबंधितांना विभागीय आयुक्तांनी सूचना केल्या. संघटनांच्या प्रतिनिधी मंडळातील प्रत्येक सदस्यांचे म्हणणे ऐकून घेत बिदरी यांनी उद्योजकांना शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची कार्ड वितरीत करण्यासाठी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करतानाच या योजनांचा लाभ कामगारांना देण्यासाठी त्यांची नोंदणी करण्यात यावी असेही यावेळी बिदरी म्हणाल्या.

English Summary: Provide benefits of health schemes to industrial workers
Published on: 10 April 2025, 05:36 IST