News

छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील टंचाई स्थिती व उपाययोजनाबाबत माहिती दिली.

Updated on 24 April, 2025 10:54 AM IST

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभागातील टंचाईग्रस्त गावात नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची दक्षता संबंधित जिल्हा प्रशासनाने घ्यावी, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा. पाणी टंचाई बाबत नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतूनसंवाद मराठवाड्याशीहा उपक्रम सुरु करण्यात आला असून, त्याअंतर्गत आज ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी पाणीटंचाई पाणीपुरवठा या विषयावर विभागातील नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, अपर आयुक्त डॉ.अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, उपस्थित होते.

वेबिनारमध्ये संबंधित जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सहभागी झाले.

छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील टंचाई स्थिती उपाययोजनाबाबत माहिती दिली.

विभागीय आयुक्त श्री.गावडे म्हणाले, आपल्या भागात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करताना कमी कालावधीच्या दिर्घकालीन अशा दोन्ही उपाययोजनांचे सुक्ष्म नियोजन करावे. आज नागरिकांनी मांडलेल्या पाणी टंचाईच्या अडचणी प्राधान्याने सोडवा, ज्या गावात टँकरची मागणी आहे तिथे प्राधान्याने टँकर उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनाने कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले.

आपल्या विभागातील ज्या गावात सातत्याने टँकर लागतात तिथे पाणी पुरवठा योजनेबाबतचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. पिण्यासाठी ठेवण्यात आलेला राखीव पाणीसाठ्याबाबत दक्षता घ्यावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आगामी कालावधीत आपल्या योजना गतीने पूर्ण केल्या तर टँकर विहिर अधिग्रहण करण्याची गरज भासणार नाही. महानगरातील पाणी वितरणाबाबतचे नियोजन वेळापत्रकानुसार करावे. यामध्ये पाणी वितरणात जास्त अंतर असणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही सूचना विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी केल्या.

संवादात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून ओमकेश यांनी जलजीवन मिशनच्या कामातील अडचणी, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून मारोती बनसोडे यांनी पाईपलाईनची गळती, नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथून संदीप वानखेडे यांनी गावातील अवैध पाणी वापर, बीड शहरातून डी.जी.तांदळे यांनी बीड शहर पाणीपुरवठा योजनेतील अडचणी, एन-7 सिडको छत्रपती संभाजीनगर येथून प्रणीत वाणी यांनी पाणीपुरवठ्यातील अडचणी, लातूर येथून अरविंद शिंदे यांनी खाजगी टँकर बाबतच्या अडचणी मांडल्या. याबाबत विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाला नागरिकांनी मांडलेल्या अडचणी तत्परतेने सोडवून याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

यावेळी अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त डॉ.अनंत गव्हाणे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, यांनी पाणी टंचाई बाबत शासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिलीयावेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांतून नागरिकांनी संवादात सहभाग घेतला.

English Summary: Promptly solve the problems of citizens regarding water scarcity Divisional Commissioner Dilip Gawde
Published on: 24 April 2025, 10:54 IST