मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसोबतच रोजगाराच्या इतर संधी उपलब्ध करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी कृषी पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. या माध्यमातून पर्यटकांना गावाकडच्या नैसर्गिक वातावरणात राहून विविध हंगामातील फळे, भाज्या, अन्नधान्य, लोककला व शेती अशा पर्यावरणपूरक गोष्टींचा आनंद घेता येईल. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे सांगितले. मंत्रालयात कृषी पर्यटनासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
कृषी पर्यटनाबाबत अधिक माहिती देताना श्री. बोंडे म्हणाले, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना ताजी फळे, दूध, चुलीवरचा स्वयंपाक, हंगामी फळे, भाज्या, ग्रामीण भागातील लोककला व तेथील परंपरा जाणून घेण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त पर्यटनाच्या माध्यमातून देखील उत्पन्न मिळेल. यासाठी काही निकष ठरविण्यात येणार असून त्यामध्ये स्थानिक शेतकरी, कृषी महाविद्यालये, गटशेती करणारे शेतकरी, महिला सहकारी संस्था यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शेकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
पर्यटकांना राहण्याची, जेवणाची व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल. पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे व्यक्त केला. बैठकीस, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कृषी विभाग व पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध गावांमधील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
Published on: 31 July 2019, 07:57 IST