नवी दिल्ली: शेतकऱ्याला चांगल्या उत्पन्नाची हमी राहावी यासाठी नाफेड आणि भारतीय अन्न महामंडळ यासारख्या केंद्रीय नोडल एजन्सी कार्यरत असतात. 2020-21 च्या रब्बी हंगामासाठी अनेक राज्यात शेतकऱ्यांकडून सुचीबद्ध वस्तूंची खरेदी सुरु झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना वेळीच विपणन सहाय्य पुरवण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात व्यवस्थापन दिशा निर्देशांचे पालन करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहाय्य पुरवण्यात येत आहे.
मूल्य आधार योजने अंतर्गत 2020-21 च्या रब्बी हंगामासाठी सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यात शेतकऱ्यांकडून डाळी आणि तेलबिया किमान आधारभूत किंमतीत खरेदी करण्यात येत आहेत. 16 एप्रिल 2020 पर्यंत नाफेड आणि भारतीय अन्न महामंडळाने, 784.77 कोटी रुपयांच्या 1,33,987.65 मेट्रिक टन डाळी आणि 29,264.17 मेट्रिक टन तेलबियांची खरेदी केली. याचा 1,14,338 शेतकऱ्यांना लाभ झाला. लॉक डाऊनच्या काळात 97,337.35 मेट्रिक टन रब्बी डाळी आणि तेलबियांची मूल्य आधार योजनेंतर्गत खरेदी करण्यात आली.
मूल्य स्थिरीकरण निधी अंतर्गत, आणि डाळींचा अतिरिक्त साठा करण्यासाठी नाफेडकडून किमान आधारभूत किंमतीत तूर खरेदी करण्यात येत आहे. पीएसएस आणि पीएसएफ अंतर्गत खरीप 2019-20 हंगामासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात तूर खरेदी सुरु आहे. 2019-20 च्या खरीप विपणन हंगामासाठी एकूण 5,32,849 मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आली यापैकी 29,328.62 मेट्रिक टन तूर लॉकडाऊनच्या काळापासून खरेदी करण्यात आली.
राजस्थान मधे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कोटा विभागात डाळी आणि तेलबिया खरेदी थांबली होती. 15 एप्रिल-2020 पासून कोटा विभागातल्या 54 केंद्रांनी कामकाज सुरु केले असून येत्या काही दिवसात आणखी केंद्रे कार्यान्वित होतील. राजस्थानच्या इतर विभागातली खरेदी केंद्रे येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्येक खरेदी केंद्रावर दर दिवसाला जास्तीत जास्त 10 शेतकऱ्यांना बोलावण्यात येत असून त्यानुसार त्यांना कळवण्यात येत आहे.
हरियाणामधे 163 केंद्रांवर 15-4-2020 पासून मोहरी आणि हरभरा खरेदी सुरु झाली आहे. सोशल डीस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी दर दिवशी मर्यादित शेतकऱ्यांना बोलावण्यात येते. पहिल्या दोन दिवसात 10,111 शेतकऱ्यांकडून 27,276.77 मेट्रिक टन मोहरी खरेदी करण्यात आली. हरभरा, मसूर आणि मोहरी खरेदीसाठी मध्यप्रदेश मधे तयारी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना त्यांचा कृषी माल खरेदी केंद्रांवर आणण्याबाबत कळवण्यात येत आहे.
Published on: 20 April 2020, 09:44 IST