नारायणगाव: ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि आत्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय दूध प्रक्रिया या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी आत्मा पुणे प्रकल्प उपसंचालिका पूनम खटावकर, केव्हीकेचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रशांत शेटे, गृहशास्त्र विभाग प्रमुख निवेदिता शेटे, आत्मा पुणेचे गट व्यवस्थापक गणेश पडवळ, धोंडीभाऊ पाबळे, सूर्यकांत विरणक तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये दुधापासून बनविण्यात येणारे विविध पदार्थ, प्रक्रियायुक्त पदार्थांचे विपणन व शासनाच्या विविध योजना यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आत्मा पुणे प्रकल्प संचालिका पूनम खटावकर यांच्या हस्ते करण्यात आले मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या आपल्याकडे दुधाचे उत्पादन अधिक आहे परंतु दुधाला मिळणारा भाव कमी आहे अशा परिस्थितीत दुधापासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून विकले तर अधिक नफा मिळू शकतो. दुधापासून कमी खर्चात दही, पनीर, श्रीखंड बनविता येते आणि ह्या पदार्थांना बाजारात चांगला भाव आहे. संपदा डेअरीचे प्रमुख प्रदीप आहेर यांनी दुधाचे संकलन करताना घ्यावयाची काळजी, फॅट. एस.एन.एफ तसेच दुधाची साठवणूक, उष्णता देण्याची प्रक्रिया, क्रीम वेगळी करणे या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
गृहशास्त्र विभागप्रमुख निवेदिता शेटे यांनी उपस्थितांंना दुधापासून बनविण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची माहिती दिली तसेच शासनाच्या विविध योजना, पदार्थ विक्रीसाठी लागणारे आवश्यक परवाने याबद्दल मार्गदर्शन केले, चैतन्य डेअरीचे राजू मानसुख यांनी दही, पनीर, श्रीखंड, व्हे ड्रिंक, तूप, ताक, लस्सी या सर्व पदार्थांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. दुसऱ्या दिवशी सर्व प्रशिक्षणार्थींना सारथी डेअरी निरगुडसर येथे प्रक्षेत्र भेट दिली. सारथी डेअरीचे मेश्राम साहेब यांनी दुध पॅकिंग तसेच खवा, तूप, पनीर, दही बनविणाऱ्या मशिनरीबद्दल मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाचा सांगता समारंभ हा सर्व शेतकरी व महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटून पार पडला. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे हे म्हणाले कि, दुध प्रक्रिया उद्योगासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकेल त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा.
Published on: 06 November 2018, 06:51 IST