News

राज्यातील खासगी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा, चौथा थकबाकी हप्ता व ४ टक्के महागाई वाढ भत्ता तातडीने देण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे येत्‍या शुक्रवारी (ता. सात) विदर्भस्तरीय धरणे आंदोलन पुकारले होते.

Updated on 04 July, 2023 11:41 AM IST

राज्यातील खासगी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा, चौथा थकबाकी हप्ता व ४ टक्के महागाई वाढ भत्ता तातडीने देण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे येत्‍या शुक्रवारी (ता. सात) विदर्भस्तरीय धरणे आंदोलन पुकारले होते.

मात्र, आंदोलनापूर्वीच राज्‍यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ४ टक्‍के महागाई वाढ भत्ता देण्याची मागणी पूर्ण झाल्‍याने विमाशि संघाच्या मागणीला यश आले आहे.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. कार्यालयासमोर व शिक्षण उपसंचालक नागपूर/अमरावती यांच्या कार्यालयासमोर राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा थकबाकी हप्ता व ४ टक्के महागाई वाढ भत्ता देण्यासाठी शुक्रवारी आंदोलन पुकारले होते.

यासंदर्भात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले व प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना २२ जून रोजी नोटीस दिली होती. शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असताना राज्यातील अनेक शिक्षक - शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तिसराच हप्ता देण्यात आला नाही.

ही शिक्षकांवर अन्याय करणारी बाब असल्याने व जानेवारी २०२३ पासून केंद्रातील कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई भत्ता लागू केला असल्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव ४ टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करण्यात यावा यासाठी हे आंदोलन करण्यात येणार होते.

या आंदोलनाची दखल घेत ३० जून २०२३ रोजी वित्त विभागाने सातव्‍या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ टक्‍के वरून ४२ टक्‍के करण्यात यावा.

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे जून २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश निर्गमित केले. असे असले तरी आंदोलनाची भूमीका ठाम आहे.

आंदोलनाला सहकार्य करावे अावाहन सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले, महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे व प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे तसेच विदर्भातील सर्व प्रांतीय पदाधिकारी, यांनी केले आहे.

English Summary: Private subsidized teachers in the state will get four percent dearness allowance increase
Published on: 04 July 2023, 11:41 IST