ठाणे : राज्य सरकार उद्योग क्षेत्रासंबंधी चांगले निर्णय घेत आहे. या शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही. खाजगी उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी शासनाच्या धोरणांवर विश्वास ठेवून शासनासोबत यावे आणि मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यासारख्या योजनांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
लक्ष्यवेध इन्स्टिटयूट आयोजित ठाणे येथील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी “बिझनेस जत्रा 2023 सोहळा उद्योजकतेचा, उत्सव महाराष्ट्रीय लघुउद्योजकांचा..!” या बिझनेस जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ही बिझनेस जत्रा दि.1 आणि 2 डिसेंबर 2023 रोजी, टीप टॉप प्लाझा, ठाणे येथे सुरु असणार आहे.
यावेळी उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, नवउद्योजक घडवून त्यांना बळ देण्याचे धोरण शासन अतिशय गांभिर्याने राबवित आहे. महाराष्ट्राने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत गेल्या वर्षात 5 हजार 16 उद्योजक तयार केले आणि आता गेल्या नऊ महिन्यात 13 हजार 256 नवउद्योजक उभे राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या प्रकल्पांसोबत 1 कोटी 37 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
रत्नागिरीत कोकाकोलाचा पहिला मोठा प्रकल्प उभा करीत आहोत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कोका-कोला च्या सीईओंना सांगितले की, आमच्याकडे तज्ञांपासून ते कामगारांपर्यंत सर्व काही आहे. याबरोबरच इतर सर्व आवश्यक सुविधाही आहेत. यावर कोका-कोलाच्या सीईओ नी 1 हजार 500 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले.
गडचिरोली सारख्या जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रकल्प उभा राहत आहे. तेथे सर्वात मोठी स्मॉल स्केल इंडस्ट्री उभी राहणार आहे. यासाठी 5 हजार एकर जागा भूसंपादित केली जाणार आहे. मुख्यमंत्री त्याबाबत अत्यंत प्रयत्नशील असून ते यशस्वी सिद्ध झाले आहेत. स्मॉल स्केल इंडस्ट्री बळकट होण्यासाठी शासनही पूर्ण क्षमतेने नवउद्योजकांच्या पाठीशी उभी आहे.
पुढे सामंत म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली पंतप्रधान विश्वकर्मा योजना राज्यात मिशन मोड मध्ये राबविली जाईल. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या माध्यमातून देश निश्चितच बलवान होईल. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात लघुउद्योजक तयार होतील. ही योजना राबविण्यासाठी केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी लागलीच मंजूरही केला आहे. यातून गावेही बळकट होतील.
दरम्यान, विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने Tow–Go या घनकचरा व्यवस्थापन सेवेची ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अमंलबजवणीची सुरुवात होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
Published on: 02 December 2023, 12:51 IST