नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आणि आतंकवादी यांना मदत करणे आणि उकसणे अशा कृती करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असे ठणकावून सांगितले. पंतप्रधानांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे की, भारताला अस्थिर करु शकू अशा भ्रमात पाकिस्तानने राहू नये. पंतप्रधानांनी सुरक्षा जवानांतर्फे करण्यात येणाऱ्या चौकशी आणि कारवाईसंदर्भात त्यांना पूर्ण सूट दिली आहे. पंतप्रधानांनी ही बाब नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर, नवी दिल्ली-वाराणसी दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवण्याच्या पूर्वी उपस्थित लोकांना संबोधन करताना सांगितली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीला पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्याबाबत पंतप्रधानांचे व्यक्तव्य खालीलप्रमाणे:-
“सर्व प्रथम मी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी देशाची सेवा करताना आपले प्राण गमावले आहेत. दु:खाच्या या प्रसंगी माझ्या आणि प्रत्येक भारतीयांच्या संवेदना त्यांच्या परिवारासह आहेत.
या हल्ल्यामुळे देशातील जनतेमध्ये आक्रोश असून लोकांचे रक्त उसळून येत आहे हे मी चांगल्या प्रकारे ओळखून आहे. यावेळी देशाची जी अपेक्षा आहे, काहीतरी करुन दाखवण्याची भावना, ती स्वाभाविकच आहे. आमच्या सुरक्षादलातील जवानांना पूर्ण स्वातंत्र्य दिले गेले होते. सैनिकांच्या शौर्यावर, बहादुरीवर माझा पूर्ण विश्वास आहे. देशभक्तीच्या रंगात रंगणारे लोक खरी माहिती आमच्या संस्थांपर्यंत पोहोचवतील ज्यामुळे आतंकवाद्यांना नाकाम करणे आणि आतंकवादाविरुद्धची आमची लढाई वेगवान होण्यास मदत होईल. मी आतंकवादी संगठना आणि त्यांचे मदतनीस यांना निक्षून सांगतो की, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल.
मी देशाला विश्वास देतो की, या हल्ल्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे, जो गुन्हेगार आहे त्यांना निश्चितच शिक्षा होईल. जे आमच्यावर टीका करत आहेत त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
परंतु माझ्या सर्व मित्रांना माझा अनुरोध आहे की, ही वेळ खूप संवेदनशील आणि भावूक आहे. पक्षातील असो किंवा विपक्षातील असो आपण सर्व राजनितीच्या कुटकारस्थानांपासून दूर रहायला हवे. यावेळी देश एकजूट होऊन आतंकवादी हल्ल्याचा सामना करत आहे, देशाची एकजूटता आहे. देश हा एक स्वर असून जो विश्वात गुंजायला हवा कारण या लढाईत, आधीच जागतिक पातळीवर एकटा पडलेला आमचा शेजारी देश अशा भ्रमात आहे की आपण कुठलेही कृत्य केले, चाली रचल्या तर यामुळे भारतात अस्थिरता निर्माण करण्यास आपण यशस्वी होऊ. हे स्वप्न त्यांनी सदासर्वकाळासाठी सोडून द्यावे. कारण ही त्यांची मनिषा कधीसुद्धा पूर्ण होणार नाही.
आमचा शेजारी देश सध्या मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत असला तरीही या देशाला असे वाटते की, भारतात अस्थिरता निर्माण केल्यानंतर भारताची स्थिती कमकुवत होईल. हे त्यांचे मनोरथ कधीही पूर्ण होणार नाही. काळाने सिद्ध केले आहे की, ज्या मार्गाने शेजारी राष्ट्र चालले आहे तो विनाशाकडे जाणारा आहे. आपला मार्ग समृद्धी आणि विकासाकडे नेणारा आहे.
130 कोटी भारतीय अशा प्रकारच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. बऱ्याच मोठ्या देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि भारताला पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. मी या सर्व देशांचा आभारी आहे. मी या सर्व राष्ट्रांना अशी विनंती करतो की, त्यांनी जागतिक दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात मदतीचे हात द्यावेत. मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन आतंकवादाचा बिमोड करावा. दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यात सर्व देशांचे जर एक मत, एक स्वर, एक दिशा या पद्धतीने मार्गक्रमण झाले तर दहशतवाद काही क्षणांपर्यंत सुद्धा टिकू शकणार नाही.
मित्रांनो, पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांची मन:स्थिती आणि वातावरण दु:ख आणि आक्रोशपूर्ण आहे. अशा हल्ल्याचा देश एकजुटीने सामना करेल. हा देश थांबणारा नाही. आमच्या वीर शहीदांनी प्राणांची आहुती दिली आहे. तसेच देशासाठी प्राणाचा त्याग करणारा प्रत्येक शहीद दोन स्वप्ने जीवनाच्या डावावर लावतो एक म्हणजे देशाची सुरक्षा आणि दुसरे म्हणजे देशाची समृद्धी. मी सर्व वीर शहीदांना त्यांच्या आत्म्याला नमन करतांना त्यांचे आशिर्वाद घेतांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण खर्ची घालू असे आश्वासन देतो. समृद्धीच्या मार्गाला सुद्धा आम्ही अधिक गती देऊ, विकासाचा मार्ग अधिक ताकदवान करु. आमच्या या वीर शहीदांच्या आत्म्याला नमन करुन आपण पुढे जाण्याचा मार्ग पादाक्रांत करु. या संदर्भात मी वंदे भारत एक्स्प्रेसची संकल्पना आणि डिजाईन प्रत्यक्षात उतरवणाऱ्या प्रत्येक इंजिनीअर, कामगार यांचे आभार व्यक्त करतो.”
Published on: 16 February 2019, 08:48 IST