पंतप्रधानांचा व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून बचत गटाच्या सदस्यांशी थेट संवाद

Saturday, 14 July 2018 07:39 AM
मा. पंतप्रधान छत्तीसगड राज्यातील महिलांशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधताना

मा. पंतप्रधान छत्तीसगड राज्यातील महिलांशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधताना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या बचत गट सदस्यांशी तसेच दीनदयाल अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून थेट संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातल्या विविध स्वयं सहाय्यता बचत गटाच्या एक कोटीहून अधिक महिला प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून होत असलेल्या संवादाचा हा नववा अंक होता.

विविध बचत गटांच्या महिलांशी झालेला संवाद अत्यंत आनंददायी होता असे सांगत प्रत्येक महिला दृढ निश्चय, एकत्रित प्रयत्न आणि स्वयं उद्यमशीलतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे असे पंतप्रधान म्हणाले. या महिला उद्योगी आहेत तसेच अत्यंत विषम परिस्थितीत त्यांना स्वत:च्या शक्तीची जाणीव होते आणि त्या या परिस्थितीशी लढा देतात. केवळ त्यांना संधी मिळण्याची गरज आहे असे ते म्हणाले. महिलांच्या योगदानाशिवाय कृषी आणि पशुपालन, दुग्ध व्यवसाय अशा क्षेत्रांची कल्पनाही करणे कठिण आहे, असे मोदी म्हणाले. महिला सक्षमीकरणाचे देशातील हे मूर्तीमंत चित्र आहे, असे त्यांनी सांगितले.

दीन दयाल अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाच्या लाभार्थ्यांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला. या योजना देशातल्या सर्व राज्यात राबवल्या जात असून देशभरातल्या अडीच लाख ग्रामपंचायतीतल्या सर्व घरांमधल्या महिलांना रोजगाराची शाश्वत संधी मिळवून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले.

गरीब विशेषत: ग्रामीण भागातल्या महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीमध्ये बचत गटांची महत्वाची भूमिका आहे असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या चार वर्षात देशात बचत गटांची संख्या चौपट झाली असून त्यातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी आणि उद्योजकता निर्माण झाली आहे असे ते म्हणाले. वर्ष २०११ ते २०१४ या काळात देशभरात पाच लाख बचत गट होते. मात्र २०१४ नंतर ही संख्या २० लाखांवर पोहोचली असून सव्वा दोन कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळतो आहे.

बचत गटांची चळवळ वाढवण्यासाठी सरकार प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि संधी उपलब्ध करुन देते, असेही ते म्हणाले. महिला किसान सशक्तीकरण योजनेअंतर्गत देशातल्या ३३ लाख महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या देशात ४५ लाख बचत गट असून त्यात ५ कोटी महिला कार्यरत आहेत असे त्यांनी सांगितले.

दीन दयाल अंत्योदय योजनेअंतर्गत, ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. हे प्रशिक्षण नोकरी तसेच स्वयं रोजगारासाठी दिले जाते असे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत ६०० ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातून २८ लाख युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी १९ लाख युवकांना रोजगारही मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मूल्य साखळी आणि मूल्यवर्धनाचे महत्व सांगितले. सर्व बचत गटांनी सरकारच्या जेम या ई-पणन पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

या संवादाच्या वेळी विविध महिलांनी बचत गटांशी संबंधित यशस्वी गाथा आणि अनुभव पंतप्रधानांना सांगितले. गरीब कुटुंबातल्या महिलांनी आत्मविश्वास आणि स्वत:च्या हिंमतीच्या भरवश्यावर सर्व अडचणींचा सामना करत मिळवलेल्या यशाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. या बचत गटांमुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे महिलांनी सांगितले. या महिलांनी आपल्या यशस्वितेच्या कथा छायाचित्रांसह नरेंद्र मोदी ॲप वर पाठवाव्यात असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.