राज्याच्या विविध भागातील तापमानाचा पारा हा चाळीशीपार गेला आहे. विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा चटका अधिक असल्याने नागरिक हैरान झाले आहेत. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमझध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान राज्यात पुर्वमोसमी पावसालाही पोषक हवामान आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
अकोला येथे तीन दिवस सातत्याने तापमान ४४.९ अंशावर आहे. बह्मपुरी, चंद्रपूर येथे तापमान ४४ अंशाच्या पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ३४ ते ४४ अंशाच्या दरम्यान आहे. विदर्भात पारा ४० ते ४५ तर मराठवाड्यात ४१ ते ४४ अंश तसेच कोकणात कमाल तापमान ३३ ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. पण देशातील इतर राज्यातील परिस्थिती मात्र निराळी आहे. हवामान विभागाच्या मते पुढील २४ तासात पुर्वेकडील भारत, उप हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, किनारपट्टीवरील ओडिसा, पंजाब, हरियाणा आणि उत्तरीकडील राजस्थानातील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, अंतर्गत तमिलनाडु, केरळ, दक्षिणी-अंतर्गत कर्नाटक, पश्चिमी और मध्य उत्तर प्रदेश तसेच उत्तरी मध्य प्रदेशातही मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.
स्कायमेटनुसार, दक्षिण- पश्चिमी राजस्थान आणि आसपासच्या परिसरातील भागात चक्रीय हवा तयार झाली आहे. दुसरे चक्रीय वातावरण दक्षिण- पुर्वी मध्यप्रदेश आणि लगतच्या छत्तीसगडवर आहे. मागील २४ तासादरम्यान पुर्वेकडील भारतात पावसाची स्थिती दिसून आली. बिहारमधील काही भागात गारपिटीसह दमदार पाऊस झाला. ओडिसा, झारखंड, पुर्व आणि मध्य उत्तर प्रदेशातील काही भागात आणि केरळमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी विरुन गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. विदर्भात सक्रिय असलेल्या दक्षिणोत्तर कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्राकार वाऱ्यात रुपांतर झाले आहे. यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होऊन आज विदर्भ, मराठवाडा, मध्यमहाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज आहे.
Published on: 07 May 2020, 01:16 IST