News

पंढरपूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विचारावरच राज्य शासनाचे काम सुरू आहे. राज्यातील जनतेच्या मनातील आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत असून राज्यात चांगला पाऊस पडू दे… दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम करण्याचे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले.

Updated on 13 July, 2019 8:45 AM IST


पंढरपूर:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विचारावरच राज्य शासनाचे काम सुरू आहे. राज्यातील जनतेच्या मनातील आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत असून राज्यात चांगला पाऊस पडू दे… दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम करण्याचे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले.आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी विठ्ठल चव्हाण आणि प्रयागबाई चव्हाण (मु.पो. सांगवी सुनेगांव तांडा, ता. अहमदपूर, जि. लातूर) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली.

महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार मंदिराच्या सभामंडपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्रात परकीय आक्रमणांच्या काळात धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम वारी आणि वारकऱ्यांनी केले. गेल्या अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. या सकारात्मक शक्तीचा वापर महाराष्ट्राला हरित, समृद्ध आणि वनाच्छादित करण्यासाठी करण्यात येणार आहे. 

सामाजिक संस्थांच्या मदतीने शेकडो वर्षांची परंपरा असणारी ही वारी निर्मल आणि स्वच्छ करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वारकऱ्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले. जनभावना आणि जनभावनेचा आदर करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिली. याच प्रेरणेतून मराठा आणि धनगर समाजाला न्याय देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षात मंदिर समितीच्या वतीने सुरू असलेल्या कामांची प्रशंसा करून चंद्रभागा नदीच्या शुध्दीकरणासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'नमामि चंद्रभागा' अभियानाला यशस्वी करण्यासाठी सर्व वारकऱ्यांनी त्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.   

मुख्यमंत्र्यांचा सत्कार 

मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शेतकरी आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी  सत्कार करण्यात आला. तसेच मंदिरातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी एसटी महामंडळाच्या वतीने मानाच्या वारकऱ्यांना एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच मंदिर संस्थांच्या उपक्रमांचा आणि वाटचालीचा आढावा घेणाऱ्या 'माईल स्टोन' सह रिंगण आणि वेदसोहळा या पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा स्वच्छ दिंडीचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील मारुतीबुवा कराडकर दिंडीला एक लाख रुपये व मानचिन्ह, दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सदगुरु म्हातारबाबा पाथरुडकर दिंडीला पंच्याहत्तर हजार रुपये रोख व मानचिन्ह तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला पन्नास हजार रुपये व मानचिन्ह अशा स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. अतुल भोसले यांनी मंदिर समितीच्या कामांचा आढावा सादर केला. आभार सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मानले.   

English Summary: pray to god vitthal pandharpur maharashtra give good rainfall & Drought free
Published on: 13 July 2019, 08:42 IST