कोरोना व्हायरसने जगात हाहाकार माजवला असून सर्व क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. पोल्ट्री उद्योगासाठी तर हे अस्मानी संकटच म्हणावे लागेल. अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी पक्षी आणि अंडी नष्ट केले आहेत. मासांहार केल्याने कोरोना व्हायरसची लागण होते, अशी भीती लोकांच्या मनात घर करुन बसली आहे. यामुळे पोल्ट्री उद्योगावर संक्रात ओढवली आहे. भाज्यांपेक्षाही कमी दरात चिकन विकले जात आहे. तर काही ठिकाणी कोंबड्यांना मागणीच नसल्याने पोल्ट्री मालक कोंबड्या मोफत वाटत आहेत.
उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील एका पोल्ट्री फर्म मालकाने असाच प्रकार केला. अवघ्या २० रुपयात त्याने कोंबड्या विकायला काढल्या आहेत. आणि ज्याच्याकडे बीपीएल आणि आधारकार्ड असेल तर त्यांना मोफत कोंबड्या देण्याची योजना सुरू केली आहे. राज्यातील अमरावतीतही असाच प्रकार समोर आला. येथील पोल्ट्री व्यावसायिकांनी मोफत कोंबडी आणि अंडे वाटप आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले होते. केरळप्रमाणे प्रति पक्षी १०० रुपये तसेच अंड्याला ५ रुपयांप्रमाणे शासनाने अनुदान द्यावे, ग्रामपंचायतीद्वारे आकारण्यात येणारा मालमत्ता कर रद्द करावा, वीजबिलातून सूट मिळावी आदी मागण्या यावेळी व्यावसायिकांनी केल्या.
मांसाहार केल्याने कोरोना व्हायरसची लागण होते, अशी अफवा पसरल्याने अमरावती सारख्या पोल्ट्री हबला मोठा फटका बसला आहे. विदर्भात पोल्ट्री व्यवसायाचे हब म्हणून अमरावतीची ओळख आहे. मोठ्या प्रमाणावर अंडी आणि ब्रॉयलर पक्ष्याचे उत्पादन येथे होते. परंतु कोरोनामुळे येथील व्यावसायिकांवर मोठं संकट ओढावले आहे. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असून दररोज २ कोटी रुपयांचे नुकसान व्यावसायिकांना सोसावे लागत आहे.
मासांहार खाल्याने नाही होत कोरोना व्हायरसची लागण
अनेक डॉक्टरांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, मासांहार केल्याने कोरोनाची लागण होत नाही. परंतु नागरिकांच्या मनात भीती बसल्यामुळे कोणीच त्याकडे लक्ष देताना दिसत नाही. मंत्र्यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. परंतु ग्राहकांनी चिकनकडे कानाडोळा करत शाकाहाराला पसंती दिली आहे. पोल्ट्री उद्योगावर कोरोना नावाचे मोठे संकट आले आहे. कोरोनाचे वृत्त माध्यमात येत असतानाच सोशल मीडियावर मासांहारविषयी अफवा पसरवल्या जात होत्या.
Published on: 18 March 2020, 05:34 IST