News

जालना: निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच पावसाच्या अनियमिततेमुळे सातत्याने शेतकऱ्याला नापिकीला सामोरे जावे लागते. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने पारंपारिक शेतीबरोबरच शेतीला पूरक असा व्यवसाय शेतकऱ्यांनी करण्याची गरज असून कृषी क्षेत्रातील विविध समस्या दूर करण्याची ताकद समृद्ध पशुपालनामध्ये आहे. देशातील विविध प्रजाती, पशुधन, शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेले महापशुधन एक्स्पो 2019 हे शेतकरी तसेच पशुपालकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला.

Updated on 04 February, 2019 8:49 AM IST


जालना:
निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच पावसाच्या अनियमिततेमुळे सातत्याने शेतकऱ्याला नापिकीला सामोरे जावे लागते. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने पारंपारिक शेतीबरोबरच शेतीला पूरक असा व्यवसाय शेतकऱ्यांनी करण्याची गरज असून कृषी क्षेत्रातील विविध समस्या दूर करण्याची ताकद समृद्ध पशुपालनामध्ये आहे. देशातील विविध प्रजाती, पशुधन, शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेले महापशुधन एक्स्पो 2019 हे शेतकरी तसेच पशुपालकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील विस्तीर्ण अशा प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन विभानसभा अध्यक्ष श्री. बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार संदीपान भुमरे, आमदार राजेश टोपे, औरंगाबाद जि.प.च्या अध्यक्षा श्रीमती देवयाणी डोणगावकर, जालना जि.प.चे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शेष महाराज गोंदीकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, संतोष सांबरे, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, अंबादास दानवे, अभिमन्यू खोतकर, संजय खोतकर, राजेश राऊत, ए.जे. बोराडे, विलास नाईक, किशारे अग्रवाल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले की, पशुपालन हा शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातुन शेतीला पुरक असे जोडधंदे करण्याची गरज आहे. दुग्धव्यवसाय हा शेतीसाठी जोडधंदा म्हणून अत्यंत उपयुक्त असुन हा व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. महापशुधन एक्स्पोमध्ये देशातील नामवंत अशा विविध प्रजाती, पशुधनाचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगत गीर, देवणी, लाल कंधारी यासारख्या जातीच्या गायींपासुन  अत्यंत चांगल्या पद्धतीच्या दुधाचे संकलन होत असल्याने यासारख्या जातीच्या गाईचे संगोपन करुन दुग्धव्यवसायाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांनी आपली उन्नती साधण्याची गरज आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत मंत्री महादेव जानकर व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या पुढाकाराने जालन्यामध्ये उत्कृष्ट अशा पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत या प्रदर्शनाचा फायदा मराठवाडा, विदर्भासह राज्यातील शेतकरी व पशुपालकांना होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री. जानकर म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे सारथ्य करत उपेक्षितांच्या दारीअंगणी विकासाचा प्रवाह पोहोचविणारा पशुसंवर्धन विभाग आजवर प्रगत व उन्नत महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यात आघाडीवर राहिला आहे. पशुजन्य उत्पादनांना वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत असलेला अपुरा पुरवठा यामुळे पशुसंवर्धनाशी संबंधित सर्व व्यवसाय आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरु पाहत आहेत. शेतीच्या उत्पन्नातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या हाती चार अधिकचे पैसे मिळवून देण्यात आपण यशस्वी ठरलो असल्याचे सांगत पशुसंवर्धन विभागाने विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना हक्काचा रोजगार मिळवुन देण्यात यश मिळवले असुन मागेल त्याला पशुधन ही प्रस्तावित योजना ग्रामीण महाराष्ट्रातील बेरोजगारांची समस्या पूर्णत: निकाली काढेल असे सांगत जालना येथे आयोजित करण्यात आलेले पशुप्रदर्शन हे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी प्रगतीची संधी आणि विकासाची नांदी ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य शासन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित असून त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्यादृष्टीने प्रयत्नही करण्यात येत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या योजना पशुपालक तसेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री व राज्यमंत्र्यांनी जालना येथे भव्य अशा महापशुधन प्रदर्शनाचे आयोजन करुन अनेक नामवंत जाती, प्रजातीच्या पशुपक्षांच्या माहितीसह तांत्रिक माहितीही या माध्यमातुन मिळणार असल्याने येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसह पशुपालकांना याचा निश्चितच फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. खोतकर म्हणाले की, शेती आणि पशुसंवर्धन ही ग्रामीण विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत. श्रमिकांच्या हाताला काम आणि कष्टाला दाम देण्याचे कार्य शेती इतकेच पशुसंवर्धनाने केले आहे. विकासाचा प्रवाह प्रत्येक पशुपालक शेतकऱ्याच्या दारापर्यंत पोहोचवत ग्रामीण महाराष्ट्राला उन्नत व विकसित महाराष्ट म्हणुन नावारुपास आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ठोस पावले उचचली असुन पशुपालकांशी संवादाच्या माध्यमातुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत ग्रामीण विकासाचे चित्र सुस्पष्ट करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सातत्याने प्रयत्न करत असुन महापशुधन प्रदर्शन हा त्याचाच एक भाग असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महापशुधन 2019 प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि इतरांना त्यासाठी प्रवृत्त करावे अशी अपेक्षा व्यक्त करत घरी जाताना एक स्वप्न मनात बाळगा की मी उद्योजक होणारच. महत्वाकांक्षेच्या घडयाळाला प्रयत्नांची चावी दिली की यशाचे काटे आपोआप फिरु लागतात, हा मूलमंत्री लक्षात ठेवा. शासन तुमच्या सैदव पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  

यावेळी चारा साक्षरता अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचतगटांमध्ये सावित्रीबाई फुले स्वयंसहाय्यता बचतगटास प्रथम, फकीरबाबा स्वयंसहाय्यता बचतगटास द्वितीय तर जय श्रीकृष्णा बचतगटास तृतीय पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या पशुधन ऐश्वर्य या मासिकाच्या पाचव्या अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका श्रीमती ज्योती अंबेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन उपस्थितीची मने जिंकून घेतली. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी, विद्यार्थी, महिला आदी जवळपास दीड लाख लोकांनी या प्रदर्शनास भेट दिली. या उद्घाटन सोहळ्यास पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, पशुपालक तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

English Summary: Potential in Livestock to solve various problems related to agricultural sector
Published on: 04 February 2019, 08:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)