भारतात डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, भारतातील एकूण डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात देखील डाळिंब लागवड उल्लेखनीय आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे डाळिंब उत्पादकांना मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. अतिवृष्टी अवकाळी व त्यानंतर तयार झालेल्या वातावरणामुळे डाळिंबाच्या उत्पादनात कमालीची घट नमूद करण्यात आली. आणि जेव्हा कुठल्याही पिकाचे उत्पादन कमी होते तेव्हा त्या पिकाला चांगला बाजारभाव मिळतो हेच बाजारपेठेचे गणित आहे.
मात्र, डाळिंब पीक हे या गणिताच्या अगदी उलटे कार्य करताना दिसत आहे. कमी उत्पादनामुळे डाळिंबाचे दर हे वास्तविक वाढायला हवे होते मात्र ते वाढण्याऐवजी अजूनच घसरताना दिसत आहेत. जाणकार लोक सांगत आहेत की राज्यात जरी डाळिंबाचे उत्पादन लक्षणीय घटले असले तरी परराज्यात विशेषता गुजरात आणि राजस्थान मध्ये डाळिंबाचे उत्पादन राज्यांच्या तुलनेने अधिक आहे. आणि या राज्यातून आता डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक यायला सुरुवात झाली त्यामुळे डाळिंबाचे दर लक्षणीय घसरताना दिसत आहेत.
डाळिंब दराचा यंदाचा प्रवास!
यावर्षी डाळिंबाचा हंगाम सुरू झाला तेव्हा, डाळिंबाला विक्रमी दर प्राप्त होत होता. डाळिंब हा 130 ते 150 रुपये किलोने विकला जात होता. तसेच डाळींब हंगामाच्या मध्यंतरी बिघडलेल्या वातावरणामुळे डाळिंबाचे बाजार भाव अजुन वधारले होते. डाळिंबाच्या उत्पादनात कमालीची घट झाली होती, उत्पादनात घट होण्याचे प्रमुख कारण हे अतिवृष्टी व अवकाळी पाऊसाला सांगितले जात आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अशी आशा होती की, उत्पादनात घट झाली आहे म्हणून डाळींबाला बाजारभाव चांगला विक्रमी भेटेल आणि हा बाजारभाव दीर्घकाळ टिकेल देखील.
पण राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या या स्वप्नांना परराज्यातील डाळिंबाचे ग्रहण लागले असेच म्हणावे लागेल, कारण की आता मोठ्या प्रमाणात परराज्यातून विशेषता गुजरात आणि राजस्थान मधून डाळिंबाची आवक होत आहे आणि यामुळे राज्यातील डाळिंबाचे दर हे कमालीचे घसरले आहेत. आता डाळिंबाला ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे, त्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट व आता बाजार भावात घसरण या दोघांचा फटका बसत आहे.
Published on: 29 December 2021, 08:55 IST