गेल्या दोन दशकापासून राज्यात उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांची लागवड करताना नजरेस पडत आहेत, शेतकरी बांधव फळबाग पिकांपैकी सर्वात जास्त डाळिंब लागवडीकडे आकृष्ट झालेले नजरेस पडलेत. मात्र उत्पादन वाढीच्या अनुषंगाने केलेलीही डाळिंबाची लागवड पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना चांगलीच अंगाशी आली आहे आणि आता तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पूर्वी इंदापूर तालुक्यात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा थाट होता, परिसरातील शेतकरी डाळिंबाला हमीचे पिक म्हणून संबोधित असतं.
ज्या शेतकऱ्यांची डाळिंबाची बाग असे त्याला समाजात विशेष स्थान प्राप्त होत असे तालुक्यातील अनेक शेतकरी डाळिंबाच्या जीवावर श्रीमंत देखील झाल्याचे चित्र तालुक्यात बघायला मिळते. मात्र श्रीमंत बनवणारी ही डाळिंबाची शेती काळाच्या ओघात येथील शेतकऱ्यांना दरिद्री बनवत आहे तालुक्यातील अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी तर आता कर्जबाजारी झाल्याचे समोर येत आहे. जी डाळिंबाची शेती शेतकऱ्याला 'अर्श से लेकर फर्श तक' घेऊन जात होती तीच शेती आता शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवून सोडत आहे.
इंदापूर तालुक्यातील अनेक गावात मागील वीस वर्षां पूर्वी गणेश भगवा तसेच आरक्ता जातीच्या डाळिंबाची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली होती. तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाच्या व्यवस्थापनासाठी लाखोंचा खर्च देखील केला. पाणी व्यवस्थापनासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेततळे बांधले, तर काही शेतकऱ्यांनी नव्याने शेती विकत घेऊन त्या क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली. शेतकऱ्याच्या या आटापिटाला सुरुवातीच्या काळात जवळपास दहा वर्ष चांगले यश देखील मिळाले. या यशामुळे शेतकरी बांधव पुरता गदगद झाला आणि डाळिंबाच्या भरोशावर वेगवेगळ्या बँकेकडून लाखो रुपयांची कर्ज उचलली आणि गावात शहरी भागाप्रमाणे मोठ्या टोलेजंग बंगले उभारले. बंगले उभारले त्यामुळे बंगल्याला शोभेल अशी आलिशान गाडी देखील असणे अनिवार्य असल्याने अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या महागड्या गाड्या विकत घेतल्या.
सुरुवातीला तालुक्यातील डाळिंब देशांतर्गत गुजरात राज्यात तसेच दुबई सारख्या देशात देखील निर्यात केला जायचा. सुरुवातीच्या काळात अनेक शेतकऱ्यांना चारशे रुपये किलोपर्यंत देखील बाजारभाव प्राप्त होत होता. त्यामुळे तालुक्यात झपाट्याने डाळिंबाचे क्षेत्र वाढले. मात्र 2014 नंतर तालुक्यातील डाळिंब शेतीचे चित्र संपूर्ण पालटले. 2014 साली झालेल्या अवकाळी व गारपीटीमुळे तेल्या व मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसायला लागला. तेव्हापासून वारंवार बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट जाणवायला लागली. वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील डाळिंब बागांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट कायम बनत राहिले. तालुक्यातील अनेक प्रगत शेतकऱ्यांनी यावर देखील मात केली व मोठ्या प्रमाणात डाळींबाचे दर्जेदार उत्पादन प्राप्त केले, मात्र पिकवलेला डाळिंब बाजारपेठेत चांगल्या दरात विक्री होत नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
त्यामुळे तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी डाळींब पिकवण्याऐवजी इतर पर्यायांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या अनुषंगाने तालुक्यात पेरू सीताफळ इत्यादी फळबाग पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आता तालुक्यातील डाळिंब शेती जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, तालुक्यात दोनच वर्षात एक हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र कमी झाले आहे. इंदापूर तालुक्यात मागील पाच वर्षापासून तेल्या मर रोग यामुळे डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात नामशेष झाल्या आहेत. मात्र वेगवेगळ्या बॅंकांच्या कर्जापोटी अद्याप पर्यंत शेतकर्यांच्या सातबारावर डाळिंबाची लागवड कायम ठेवले गेले असल्याचे चित्र तालुक्यात नजरेस पडते.
Published on: 25 January 2022, 09:55 IST