भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे, कारण की आपल्या देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या की केवळ आणि केवळ शेती व्यवसायावर अवलंबून आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीक्षेत्राचा सिंहाचा वाटा असल्याने भारत कृषीप्रधान देशाचा तमगा मिरवीत असतो. शेतीला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून देखील संबोधले जाते, म्हणून शेती क्षेत्राच्या विकासासाठी तसेच शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन दरबारी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असतात. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा सरकारचा मानस असतो. भारत सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी मानधन योजना नामक एक महत्त्वाकांक्षी योजना देशभरात राबवीत आहे. शेतकरी मानधन योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना वार्षिक 36 हजार रुपये दिले जातात, म्हणजे या योजनेअंतर्गत महिन्याकाठी तीन हजार रुपये पात्र शेतकर्यांना प्राप्त होतात.
पी एम किसान मानधन योजना
पीएम किसान मानधन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 60 वर्षापर्यंत ठराविक पैसे जमा करावे लागतात. आणि जेव्हा शेतकऱ्यांचे साठ वर्षे पूर्ण होतात तेव्हा त्यांना पेन्शन स्वरूपात या योजनेअंतर्गत मासिक तीन हजार रुपये दिले जातात. जर एखाद्या शेतकऱ्याने अठरा वर्षाच्या असताना या योजनेत सहभाग नोंदवला तर त्याला मासिक 55 रुपये प्रीमियम भरावा लागतो. आणि जर एखाद्या शेतकऱ्याने चाळीसाव्या वर्षी या योजनेत सहभाग नोंदवला तर त्याला 200 रुपये मासिक भरावे लागतात.
पीएम किसान मानधन योजना साठी पात्रता तरी नेमकी काय
जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना साठी पात्र असतात, हे सर्व शेतकरी पीएम किसान मानधन योजनेत सहभाग घेऊ शकतात, या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी सरकार कुठल्याही प्रकारे बळजबरी करत नाही, हे पूर्णतः शेतकऱ्याच्या इच्छेवर अवलंबून असते. जर आपणास देखील या योजनेत सहभाग नोंदवायचा असेल तर आपले वय 18 ते 40 या दरम्यान असणे गरजेचे असते. या योजनेसाठी अल्पभूधारक शेतकरी पात्र असतात, म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असू शकतात. पीएम किसान मानधन योजना अंतर्गत सहभाग नोंदवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षानंतर मासिक 3 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शन फक्त पती किंवा पत्नीलाच मिळू शकते.
पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकरी बांधवांना आपल्या जवळच्या आपले सेवा केंद्रवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर तिथे योजनेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. यासोबतच शेतकऱ्यांना आपल्या बँक खात्याची सर्व तपशील द्यावी लागणार आहे. या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी एकदा शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटला भेट द्यावी.
Published on: 20 January 2022, 10:25 IST