नवी दिल्ली
राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अंतर्गत राज्यांतील ४९ जिल्ह्यांमध्ये पाम तेल लागवड करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. ११ राज्यांतील ४९ जिल्ह्यात पाम तेल लागवड करण्यात येणार आहे. ७ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सुमारे ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर ५ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे.
पाम तेल प्रक्रिया कंपन्यांसह राज्य सरकारांनी पाम तेल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी 'मेगा ऑइल पाम प्लांटेशन ड्राइव्ह' सुरु केले आहे. यामुळं खाद्यतेल उत्पादनात भारत 'आत्मानिर्भर' होण्यास मदत होणार आहे.
कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, कर्नाटक, मिझोराम, नागालँड, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरा या प्रमुख पाम तेल उत्पादक राज्यांमध्ये पाम लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीच्या संदर्भात वेळोवेळी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, सरकारकडून शेतकऱ्यांना पाम वृक्षांची लागवड, संवर्धन आणि पाम बियांच्या काढणी बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार, खाद्यतेल कंपन्या, शेतकरी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित राज्यांचे कृषी विभाग एकत्रित काम करणार आहेत.
Published on: 16 August 2023, 12:16 IST