गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादनवाढीच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा दाखवला आहे, पारंपरिक पीक पद्धतीऐवजी आता शेतकरी बांधवांनी फळबाग पिकांकडेआपला मोर्चा वळवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातही अनेक शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीचे अनुषंगाने डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात लागवड केल्या. सुरुवातीच्या काळात डाळिंबाच्या बागेतून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा देखील प्राप्त झाला. मात्र अलीकडे सांगली जिल्ह्यातील डाळिंब बागांना तेल्या, मररोगाचा मोठा फटका बसत आहे.
जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी तेल्या व मररोगातून आपल्या सोन्यासारख्या डाळिंबाच्या बागा लाखो रुपये खर्च करून कशाबशा जोपासल्या, तेल्या व मर रोगाचा सामना करत डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबाच्या पिकातून कसेतरी उत्पन्न पदरी पाडत होते. आता मात्र सांगली जिल्ह्यातील डाळिंबाच्या बागांवर पिन होल बोरर नामक किडीचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. यामुळे जिल्ह्यातील डाळिंबाच्या बागा क्षतीग्रस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पिन होल बोरर किडीच्या हल्ल्यामुळे डाळिंबाला लागलेली फळे सर्वप्रथम पिवळी पडतात आणि नंतर ही फळे हळूहळू गळू लागतात. जिल्ह्यातील डाळिंबाच्या बागा या किडीमुळे पूर्ण वाळून गेल्या आहेत. जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात सर्वात जास्त या किडीचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. आटपाडी तालुक्यात सांगली जिल्ह्यातील सर्वात जास्त डाळिंबाच्या बागा बघायला मिळतात. हाती आलेल्या माहितीनुसार तालुक्यात जवळपास 15 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा लावल्या गेल्या आहेत. या एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पिन होल बोरर या किडीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, या किडीमुळे डाळिंबाच्या बागा पूर्ण क्षतीग्रस्त झाल्या आहेत.
15000 हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र या किडीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाल्या असून, अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी या किडीला कंटाळून आपल्या डाळिंबाच्या बागा तोडण्यात व्यस्त आहेत. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, या किडीच्या नायनाटसाठी कुठलेही परिणामकारक औषध उपलब्ध नसल्याने डाळिंबाच्या बागा काढून टाकण्याची नामुष्की ओढवेल अशी धास्ती निर्माण झाली आहे. ही किड डाळिंबाच्या झाडाच्या खोडावर अटॅक करत असते. या किडीचा डाळींबाच्या झाडावर प्रादुर्भाव झाल्यास डाळिंबाच्या झाडाच्या खोडाला ठिकठिकाणी होल पडतात आणि त्यातून भुसा बाहेर पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते परिणामी डाळिंबाचे झाड पिवळे पडते, याचा अधिक प्रादुर्भाव झाला डाळिंबाचे झाड सुकून जाते.
आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने डाळिंबाची लागवड केली होती मात्र आता या किडीच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाच्या बागा नष्ट करण्याची नामुष्की या शेतकऱ्यांवर ओढावली आहे. शेतकऱ्यांच्या मते, या आधी तेल्यासारखा महाभयंकर रोग आला होता मात्र या रोगात फक्त त्या हंगामाचे उत्पादन हातचे जात होते, डाळिंबाचे झाड तसेच राहत असे. परंतु आता या किडीच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाचे झाड क्षतीग्रस्त होत असल्याने डाळिंबाच्या बागा काढून टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे, त्यामुळे मोठ्या कष्टाने फुलवलेल्या डाळींब बागा आता अनेक ठिकाणी नाहीशा होत आहेत. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 21 February 2022, 06:06 IST