विदर्भातील अकोला जिल्ह्यात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन समवेतच तूर या शेतमालाला समाधान कारक बाजार भाव मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. असे असले तरी सोयाबीन उत्पादक शेतकरी तसेच तूर उत्पादक शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे, परिणामी बाजारपेठेत या दोन्ही शेतमालाची आवक मंदावली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अकोला बाजारपेठेत सोयाबीनला 6200 रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव प्राप्त झाला तसेच तुरीला 6 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव प्राप्त झाला. अकोला बाजारपेठेत मिळत असलेला बाजार भाव हा समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे मात्र असे असले तरी तूर उत्पादक शेतकऱ्यांना व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अजून दरवाढीची आशा असल्याने शेतकरी शेतमाल विक्रीसाठी उत्सुकता दर्शवीत नसल्याचे चित्र यावेळी बाजारपेठेत नजरेस पडले.
तुरीचा हंगाम यंदा उशिरा सुरु झाला, त्यामुळे पिंजर उपबाजार समितीत या हंगामात तुरीची उशिरा इंट्री झाली. हंगाम जरी उशीरा सुरु झाला असला तरी बाजारपेठेत तुरीला समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याचे समजत आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजार भावात उतरती कळा बघायला मिळत होती आता सोयाबीनच्या दरातही अल्पशी बढती नमूद करण्यात आली आहे. सध्या पिंजरी बाजारपेठेत सोयाबीनला सहा हजाराच्या वरती दर प्राप्त होत आहे. मिळत असलेला बाजार भाव हा गतवर्षीपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे, मात्र समाधानकारक बाजारभाव मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे बाजारभावात वृद्धि झाली नसल्याने शेतकरी बांधव अद्यापही साठवणुकीवर लक्ष केंद्रित करत आहेत. शुक्रवारी 50 क्विंटल पर्यंतची आवक नमूद करण्यात आली तसेच या दिवशी सोयाबीनची आवक 200 क्विंटलपर्यंतच आली असल्याचे बाजार समिती प्रशासनाद्वारे सांगितले गेले. बाजार समिती प्रशासनाच्या मते, भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी तूर आणि सोयाबीनची साठवणूक सुरु केली असल्याने बाजारपेठेत आवक मंदावली आहे.
बाजारपेठेत चोर परिणामी शेतकरी राजा बेजार
पिंजर बाजार समितीत शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणत असतात मात्र असे असले तरी बाजार समितीत पर्याप्त सुरक्षा नसल्याने रात्री-अपरात्री चोरीच्या घटना बाजार समितीत उघड झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मते, बाजारपेठेत आतापर्यंत सात आठ पोते सोयाबीनची चोरी झाली आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले आहेत तर अनेक शेतकऱ्यांनी चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना कळवली नाही.
शेतकऱ्यांचा तसेच व्यापाऱ्यांचा बाजार समितीत लाखो रुपयांचा शेतमाल ठेवलेला असतो मात्र बाजारपेठेत पर्याप्त सुरक्षा रक्षक तैनात नसून शेतमालाच्या सुरक्षेसाठी अन्य कुठल्याच ठोस उपाययोजना बाजार समिती प्रशासनाने केलेल्या दिसत नाहीत. परिणामी बाजारपेठेत दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढले आहे या अनुषंगाने परिसरातील शेतकऱ्यांनी काहीतरी उपाय योजना बाजार समिती प्रशासनाने कराव्या अशी मागणी केली आहे.
Published on: 04 February 2022, 04:01 IST