देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जरी परिस्थिती सुधारली नाही तर मुंबईसह राज्य लॉकडाऊन केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जर शहर लॉकडॉऊन झाले तर काय होईल, आपल्याला जीवनाश्यक वस्तू मिळतील का? असे प्रश्न नागरिकांना सतावत आहेत. याच दरम्यान केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. याशिवाय आपल्याला याचा फायदा फक्त आताच नाहीतर पुढे भविष्यातही होणार आहे. आता आपण एकाचवेळी सहा महिन्यांचे रेशन घेऊ शकणार आहोत. यामुळे देशातील साधरण ७५ कोटी रेशनकार्ड धारकांना फायदा होणार आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न पुरवठा व वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी याची माहिती दिली आहे. देशात धान्याचा मुबलक पुरवठा उपलब्ध असून सर्व राज्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. सध्या रेशन कार्डवर दोन महिन्याचे रेशन एकदम मिळते. सध्या पंजाब सरकारनेच ६ महिन्यांचे धान्य घेण्याची परवानगी दिली आहे. पण सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे.
सरकारी गोदामात पुरेसा धान्य उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. एकाचवेळी धान्य देण्याच्या निर्णयामुळे गोदामावरील ताण कमी होईल. बऱ्याच वेळेस गोदामाच्या क्षमतेपेक्षा अधिक धान्याचे उत्पादन झाले तर हे धान्य गोदामात पडून खराब होत असते. सरकारकडे आता ४३५ टन अतिरिक्त म्हणजे देशाला लागणाऱ्या धान्यापेक्षा अधिकचे धान्य सरकारकडे उपलब्ध आहे. यात २७२.१९ लाख टन तांदूळ आणि १६२. ८९ लाख टन गहू आहे. सरकारकडे पुरेसे धान्य साठा असल्याने राज्य सरकार अगाऊच धान्य घेऊ शकतात.
Published on: 20 March 2020, 06:25 IST