आपण बघत असतो की पैसे कमवण्यासाठी अनेकजण कोणत्याही थराला जाऊ शकतात. याची अनेक उदाहरणे समोर येत असतात. आता असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. आता शेंगदाण्याला चक्क हिरवा रंग देवून त्याची पिस्ता म्ह्णून विक्री केली जात होती. याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनला समजताच त्यांनी या भेसळखोऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कलरमुळे मात्र आरोग्याला देखील धोका निर्माण होऊ शकतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे कमवले असल्याचे देखील समोर आले आहे. शेंगदाण्याला आपण गरीबांचा बदाम म्हणतो. मात्र याच शेंगदाण्याला पिस्ता बनवून काही भेसळखोरांनी लुटीचा गोरखधंदा सुरू केला आहे.
शेंगदाण्याला रंग देऊन पिस्ता म्हणून त्याची विक्री सुरू आहे. शेंगदाण्याला रंगवून, सुकवून पिस्ता बनवण्याचा हा प्रकार नागपुरात सुरू होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शेंगदाण्याला घातक रंगाने रंगवून, त्याला पिस्त्याचा आकार देऊन ती मिठायांमध्ये वापरण्याचा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. यावर, अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा घालून इमारतीतून तब्बल ६०० किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केला असून नागपुरातील कोणकोणते मिठाईवाले याचा वापर करत होते याचा तपास आता सुरु करण्यात आला आहे. यामध्ये अनेक नावे समोर येण्याची शक्यता आहे.
याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून कावरापेठ येथे छापा टाकला. काशी शेंगदाणा चिप्स या नावाने असलेल्या दुकानातून शेंगदाण्याला रंग दिलेला माल जप्त करण्यात आला. हंसापुरी येथील आयुष फूड येथेही शेंगदाण्याची पिवळा रंग देऊन विक्री केली जात होती. याबाबत आपण खात असलेला पिस्त्या नसून रंगवलेला शेंगदाणा आहे, याची साधी कल्पनाही कोणाला नव्हती. यामुळे हे समजल्यावर अनेकांना धक्काच बसला आहे.
शेंगदाण्याला रंगवून, उन्हात अनेक दिवस सुकवून, चाळणीने स्वच्छ करून पिस्ता किंवा बदाम सारखे बनवले जाते. नंतर मशीनने त्याची कात्रण करून 90 रु किलोच्या शेंगदाण्याची कात्रण बाजारात पंधराशे ते सतराशे रुपये किलोने पिस्ता किंवा बदामाची कात्रण म्हणून मिठाई उत्पादकांना विकली जात होती. यामुळे याचा मोठ्या प्रमाणावर व्यापार केला असल्याचे समोर आले आहे. कायद्यानुसार खाद्यपदार्थात रंग वापरणे हा गुन्हा असून अन्नसुरक्षा कायदा 2006 नुसार उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची आहे. एक लाखाचा दंड आणि कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त तीन वर्षांचा कारावास होऊ शकतो. याबात अधिकच तपास सुरु आहे.
Published on: 17 February 2022, 10:19 IST