राज्यात रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक आहे. मात्र हवामान, सिंचन सुविधा, आणि रोगराईमुळे उत्पादनावर अनेक अडचणी येत असतात. यावर अभ्यास करून कुंदेवाडी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राने अधिक उत्पादकता व तांबेरा प्रतिबंधक वाण विकसीत केले आहेत.
यामध्ये राज्यातील मागणीचा अभ्यास करून पास्ता, शेवया, व कुरड्यसाठी प्रक्रिया योग्य असा बन्सी प्रकारातील एनआयडीडब्ल्यू -1949 हा नवा गहू वाण विकसीत केला आहे. पुढील वर्षाांपासून त्याचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. अखिल भारतीय समन्वित गहू सुधार प्रकल्पाच्या अनेक चाचण्या येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुरू असतात.
त्याच अनुषंगाने 24 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या यासंबंघी वार्षिक बैठकीत एनआयडीडब्ल्यू 1949 या बन्सी प्रकारातील वाणाची भारतातील विभागासाठी महाराष्ट्र व कर्नाट राज्यासाठी नियंत्रित पाण्याखाली लागवडीखाली शिफारस करण्यात आली आहे. हा वाण पास्ता, शेवया, कुरड्या आदींसाठी उपयुक्त असल्याचे परिणाम तपासून याबाबत घोषणा करण्यात ाली आहे. केंद्रीय पीक वाण प्रसार समितीने त्यावर शिक्कामोर्तब केले असून तो प्रसारित केली जाणार आहेत.
काय आहेत वैशिष्ट्ये
-
द्वीपकल्पीय विभागातील जिरायती किंवा एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी शिफारसीत बन्सी वाण
-
तांबेरा रोगास प्रतिकारक
-
प्रथिनांचे प्रमाण 11.50 टक्के
-
शेवया, कुरड्या व पास्तासाठी उपयुक्त
-
परिपक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस
पुढील वर्षापासून कृषी संशोधन केंद्र निफाड यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी बीजोत्पादन घेऊन बियामे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याकामी केंद्राचे प्रमुख व गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके, गहू पैदासकार, डॉ. उद्य काचोळे आदी लोकांनी हे वाण विकसीत करण्याचे काम केले आहे.
Published on: 28 November 2021, 06:06 IST