काही दिवसांपासून उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे विदर्भाच्या भागात किमान तापमानाचा पारा खाली आला आहे. उत्तर भारतातील जवळपास सर्वच भागात थंडी आहे. मात्र हिमालयाच्या परिसरात व पश्चिम बंगाल आणि सिक्कीम परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे पुढचे दोन दिवस या भागातील थंडी काहीशी कमी होणार आहे.
विदर्भाच्या अनेक भागात थंडी चांगलीच वाढली असून या भागातील किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. पुढील काही दिवस विदर्भासह राज्यातील काही भागात थंडी राहणार आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी ६.८ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
दरम्यान मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि २.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच अरबी समुद्राच्या आग्नेय भागात व मालदीवच्या परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातवरण तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरड्या असलेल्या वातावरणामुळे किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भातील काही भागांस किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आहे. गोंदिया, नागपूर, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर भागात कडाक्याची थंडी आहे. मराठवाड्यातही थंडी असल्याने किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी असल्याने किमान तापमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. अहमदनगर, नाशिक, जळगाव, मालेगाव या भागातही थंडी आहे.
Published on: 16 January 2021, 12:13 IST