देशात अनेक शेतकरी बांधव शेती पद्धतीत मोठा अमुलाग्र बदल घडवून आणीत आहेत, या बदलापैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पीकपद्धतीत होणारा बदल. देशात आता शेतकरी बांधव पारंपरिक पिकाला फाटा देत नगदी पिकांची लागवड करीत आहेत. आज आपण नगदी पिकापैकी एक खजूर पिकाची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो खजुराची लागवड अरब आणि आफ्रिकन देशात मोठ्या प्रमाणात केली जाते. अरब आणि आफ्रिकन कंट्रीज मध्ये असलेले वातावरण खजूर पिकासाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. भारतातही अनेक शेतकरी खजूर पिकाची लागवड करत असल्याचे बघायला मिळत आहे. भारतातही अनेक राज्यात खजूर लागवड करून शेतकरी बांधव मोठा नफा कमवीत आहेत.
खजूर चे झाड नर आणि मादी असे दोन प्रकारचे असते. मादी जातीमध्ये बाराही, खुंजी आणि हिलवी खजूर असे तीन प्रकार आहेत. तसेच धनमी मेल आणि मादसरीमेल या नर प्रजाती आहेत. खाण्याव्यतिरिक्त खजूरचा उपयोग ज्यूस, जॅम, चटणी, लोणचे इत्यादी तयार करण्यासाठी केला जातो त्यामुळे खजूरला बारामाही मागणी असल्याचे सांगितले जाते.
खजूर लागवडीसाठी येणारा खर्च
खजूर लागवडीसाठी जास्त खर्च करण्याची आवश्यकता नसते, खजूर पिकासाठी उत्पादन खर्च अतिशय नगण्य असतो. असे सांगितले जाते की, खजुरच्या एका झाडापासून 70 ते 100 किलोपर्यंत उत्पादन मिळते. एक एकर क्षेत्रात सुमारे 70 खजुराची झाडे लावली जाऊ शकतात. म्हणजे एका हंगामात खजूर पासून सुमारे पाच हजार किलोपर्यंत दर्जेदार उत्पादन मिळू शकते. खजूरला बाजारपेठेत चांगली किंमत मिळत असते. खजूर लागवड करून शेतकरी बांधव पाच वर्षात दोन ते तीन लाख रुपये सहज करू शकतात. म्हणजे एक झाडापासून सुमारे 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
कुठं करणार खजूर लागवड
खजुर लागवड ज्या जमिनीत चांगल्या पाण्याचा निचरा होत असेल त्या जमिनीत करण्याचा सल्ला दिला जातो. याची लागवड वालुकामय माती असलेल्या जमीनीत केली जाते. कडक माती असलेल्या आणि खडकाळ जमिनीवर खजूर लागवड कधीच केली जाऊ शकत नाही. खजूर पिकासाठी जास्त पाण्याची आवश्यकता भासत नाही. खजूरची झाडे कडक सूर्यप्रकाशात चांगली वेगाने वाढतात. खजूरच्या रोपांची योग्य वाढ होण्यासाठी 30 अंश तापमान आवश्यक असते. तसेच खजूर फळे पिकण्यासाठी 45 अंश तापमान गरजेचे असल्याचे सांगितले जाते.
खजूर पिकासाठी पूर्वमशागत
खजूर पिकाची लागवड वाळूमिश्रित जमिनीत किंवा भुसभुशीत जमिनीत केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन मिळत असते. खजूर पिकाची लागवड करण्यापूर्वी पूर्व मशागत करावी लागते. यासाठी सर्वप्रथम जमीन चांगली नांगरून घ्यावी त्यानंतर जमिनीला सूर्यप्रकाश खात एक हप्ता तसेच राहू द्यावे. त्यानंतर रोटावेटर च्या माध्यमाने जमिनीवर रोटर मारून जमीन समतल करणे महत्त्वाचे आहे. जमीन समतल झाल्यानंतर खजुराची लागवड केली जाऊ शकते.
केव्हा आणि कशी करणार लागवड
खजुराची लागवड ऑगस्ट महिन्यात केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त होत असल्याचे सांगितले जाते. याची लागवड करण्यासाठी सुमारे एक मीटर अंतरावर खड्डे खोदून घ्यावेत. खड्ड्यात जुने कुजलेले शेणखत टाकावे, आणि त्यानंतर खजूर ची रोपे त्या खड्ड्यात लावावीत. खजूरची रोपे नर्सरी अर्थात रोपवाटिकेतून आणावी लागतात. आपण एखाद्या रजिस्टर रोपवाटिकेतून खजुराची रोपे आणून त्याची लागवड करू शकता. खजुराचे झाड लागवडीनंतर सुमारे तीस वर्षानंतर उत्पादन देण्यास सज्ज होते.
खजूर पिकासाठी पाणी व्यवस्थापन
खजुराच्या झाडांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते. खूप कमी पाण्याचा उपयोग करून खजूर पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. असे असले तरी, उन्हाळ्याच्या हंगामात खजुराच्या झाडांना 15 ते 20 दिवस पाणी द्यावे. हिवाळ्यात मात्र खजूरच्या झाडांना महिन्यातून एकदाच पाणी द्यावे लागते. खजुराच्या झाडांना फळे येण्यास सुरुवात झाली की पक्ष्यांच्या हल्ल्याचा धोका असतो. पक्षी झाडांवरील फळे खाऊन टाकतात त्यामुळे अधिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. पक्ष्यांच्या हल्ल्यापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी झाडांवर जाळी टाकता येते.
Published on: 12 February 2022, 09:56 IST