गेल्या वर्षापासून राज्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या संकटात सापडला आहे, कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी राजांचे मोठे नुकसान होत आहे. गत वर्षापासून सुरू झालेली ही संकटांची मालिका या नूतन वर्ष देखील कायम असल्याचे चित्र दिसत आहे. नववर्षाच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात रब्बी पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाच्या बागा नववर्षाच्या सुरुवातीला वातावरणात झालेल्या बदलामुळे मोठ्या प्रभावित झाल्या होत्या, आता द्राक्ष पंढरी नाशिक मध्ये द्राक्ष बागांवर एक नवीन संकट आले आहे, मात्र हे नवीन संकट विदेशी आहे.
आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तान मध्ये शनिवारी त्यांच्या कराची शहरात एक मोठे धुळीचे वादळ उठले, या धुळीच्या वादळामुळे भारताच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या शहरांना मोठा फटका बसला, शनिवारी कराचीत उठलेले हे वादळ रविवारी बॉर्डर पार करत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. गुजरातच्या किनारपट्टीवर आले असल्याने याचा विपरीत परिणाम मुंबई समवेतच नाशिक मध्ये ही बघायला मिळत आहे. नाशिक मधील शेतकऱ्यांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे सकाळी सकाळीच नाशिक मध्ये रिमझिम सरी बरसल्या होत्या आणि त्यात हे वादळ नाशिक जिल्ह्यातील फळबाग पिकावर विपरीत परिणाम घडवण्यास कारणीभूत ठरू शकते. नाशिक शहरात जवळपास वीस किलोमीटर प्रति ताशी वादळी वारे वाहत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे आगामी तीन दिवसात गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात गारठा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या संपूर्ण आठवड्यात नाशिक जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे, गेल्या सात दिवसांपासून दिवसेंदिवस थंडीत वाढ नमूद करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिके विशेष प्रभावित झाल्याचे चित्र नजरेस पडत आहे. रब्बी हंगामातील गहू हरभरा कांदा या बदलत्या वातावरणाच्या तावडीत सापडला असून यामुळे भाजीपाला पिकांचे आणि जिल्ह्यातील द्राक्षांच्या बागांचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी बांधव सांगत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बदलत्या वातावरणामुळे दररोज पिकांवर महागड्या औषधांची फवारणी करत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यात दाट धुके नजरेत पडत आहे यामुळे बुरशी, तांबेरा, करपा, मावा, तुडतुडे, भुरी इत्यादी किडींचा आणि रोगांचे सावट वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात कांदा लागवड केली जाते या वर्षी देखील लक्षणीय कांदा लागवड केली गेली आहे, या बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या पिकावर बुरशीजन्य रोग चाल करून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भिती शेतकऱ्यांना भेडसावंत आहे.
एकतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी मोठा आटापिटा केला आहे, जिल्ह्यात कांद्याची रोपे अनेक शेतकऱ्यांकडे शिल्लक नव्हती म्हणून त्यांनी वाढीव दराने कांद्याची रोपे खरेदी करून कांदा लागवड केली आहे तसेच कांदा लागवडीसाठी जिल्ह्यात कमालीची मजूर टंचाई जाणवली होती त्यामुळे मजुरांना वाढीव मजुरी देऊन जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली कांदा लागवड पूर्ण केली आहे. मात्र, हा एवढा सर्व आटापिटा करून, हजारो रुपयांचा खर्च करून या बदलत्या वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या काळजात कमालीची धडधड होत आहे.
Published on: 24 January 2022, 03:14 IST