महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान

17 March 2019 07:58 AM


नवी दिल्ली:
प्रसिद्ध उद्योजक अनिलकुमार नाईक यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मविभूषण तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून एका मान्यवरास पद्मविभूषण, एका मान्यवरास पद्मभूषण तर चार मान्यवरांस पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आज 3 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 48 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातून व्यापार व उद्योग-पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे समूह अध्यक्ष अनिलकुमार नाईक यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण

वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. अशोक कुकडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. कुकडे यांनी लातूर येथे विवेकानंद हॉस्पिटलची स्थापना केली व या माध्यमातून त्यांनी गरीब रूग्णांना  रास्त दरात आरोग्य सुविधा पुरविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला यावर्षी देशातील पद्म पुरस्कारप्राप्त 112 मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 11 मान्यवरांचा समावेश होता. पैकी 6 जणांना आज सन्मानित करण्यात आले. 11 मार्च 2019 रोजी पद्म पुरस्कार प्रदानाच्या पहिल्या टप्प्यात 4 पुरस्कार  प्रदान करण्यात आले.


चार मान्यवरांना पद्मश्री 

या समारंभात 48 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील 4 मान्यवरांचा समावेश आहे. कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनोज वाजपेयी हे अभिनयाच्या विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध असून पठडीबाहेरच्या भूमिकांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. चित्रपटांतील वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी त्यांना यापूर्वी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

सामाजिक कार्य व प्राणी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सैय्यद शब्बीर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. दुष्काळी भागातील गुरांची देखभाल करण्यात सैय्यद शब्बीर यांचे अमूल्य योगदान आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून गायींची देखभाल व त्यांना जगविण्याचे काम ते अव्याहतपणे करीत आहेत.

प्रसिद्ध अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांनी कला व नाट्य क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. काँट्रॅक्टर हे विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असून पारसी आणि गुजराती रंगभूमीवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. श्री. काँट्रॅक्टर यांनी चित्रपटांमधून साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल्या आहेत.

सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे प्रा. सुदाम काटे  यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. काटे यांनी भारत देशात सिकलसेल आजाराबाबत संशोधन क्षेत्राचा पाया रोवला. प्रा. काटे हे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व उपचाराचे कार्य करीत आहेत.

padma award Ram Nath Kovind padma bhushan Padma Shri Padma Vibhushan राम नाथ कोविंद पद्म पुरस्कार पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री
English Summary: Padma awards for six eminent dignitaries in Maharashtra

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.