सिध्दगिरी नॅचरल्स उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर: जनतेचे आरोग्य जोपासण्यासाठी सेंद्रीय भाजीपाला व फळे उत्पादने उपयुक्त असून सिध्दगिरी मठाच्या या सिध्दगिरी नॅचरल्स उपक्रमासाठी कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील काही प्रमुख ठिकाणी विक्री केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केले. सिध्दगिरी मठाच्या वतीने सुरु केलेल्या सेंद्रीय भाजीपाला फळे उत्पादन विक्री केंद्र आणि घरपोच फिरत्या विक्री केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कणेरी मठाचे मठाधिपती काडसिध्देश्वर स्वामी, तानाजी निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देवून सेंद्रीय उत्पादनांना बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यासाठी सिध्दगिरी मठाने घेतलेला पुढाकार महत्वाचा असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सेंद्रीय शेतीमुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ आणि ग्राहकांना सेंद्रीय उत्पादने उपलब्ध होणार असल्याने जनतेची सामाजिक आरोग्य सदृढ राहण्यास मदत होणार आहे. तसेच सिध्दगिरी नॅचरलच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्या बद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाद्वार येत्या डिसेंबरपर्यंत 1 लाख ग्राहकापर्यंत पोहचण्याचा मठाचा संकल्प असून यास निश्चितपणे यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सिध्दगिरी मठाने सामाजिक परिवर्तनाचे अनेक उपक्रम हाती घेतले असून शाळांमध्ये खेळाचे प्रशिक्षण, गावा-गावात फिरत्या प्रयोगशाळा, शेतकऱ्यांसाठी शेटनेट तसेच सेंद्रीय शेती आणि सेंद्रीय उत्पादने वाढीसाठी घेतलेला पुढाकार मोलाचा असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सिध्दगिरी मठाच्यावतीने सेंद्रीय भाजीपाला, फळे व अन्य उत्पादनांना जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातूनही मागणी वाढणार असून जिल्ह्यात तसेच कोल्हापूर शहरातही सिध्दगिरी मठाच्या सेंद्रीय भाजी पाला विक्री केंद्रांना जागा उपलब्ध करुन देण्यात पुढाकार घेतला जाईल. सिध्दगिरी नॅचरल्स हा उपक्रम कृषी विधायक परंपरा पुढे नेणारा असून यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना मठाधिपती काडसिध्देश्वर स्वामी म्हणाले, देशात 2022 पर्यंत दुप्पट शेती उत्पन्न करण्याचा शासनाचा संकल्प आहे. याच विचारधारेवर सिध्दगिरी मठाच्यावतीने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्न वाढीसाठी भाजीपाला उत्पादनावर भर दिला असून भाजीपाला व फलांचे उत्पादन सेंद्रीय पध्दतीने करण्यास प्राधान्य दिले आहे. गेल्या दोन महिन्यात 450 ग्राहक जोडले असून येत्या डिसेंबर अखेर या योजनेतून 1 लाख ग्राहकापर्यंत पोहचण्याचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले. तसेच ग्राहक व शेतकऱ्यांसाठी या योजनेतून 2 लाखापर्यंतचा विमा योजना राबविणार असून 1 लाख ग्राहकांचा टप्पा ओलांडल्यानंतर ग्राहक व शेतकऱ्यांना घरगुती वस्तु 25 टक्के कमी दराने उपलब्ध करुन देण्याचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी दिवेज पठारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समारंभास सिध्दगिरी मठाचे मान्यवर तसेच अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
Published on: 15 September 2018, 10:04 IST