शेतीच्या आधुनिकीकरणात कीटकनाशके व रासायनिक खतांचा बेसुमार वापर त्यामुळे खालावत जाणारी जमीन व मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामास हमखास उपाय म्हणजे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह जिल्हा परिषद येथे कृषी विभागाच्यावतीने सेंद्रीय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातून एक हजार शेतकरी उपस्थित होते. कार्यशाळेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकार यांनी सेंद्रीय शेतीची संकल्पना व गरज या विषयी मार्गदर्शन करुन किड व रोग नियंत्रणासाठी विविध उपचार यामध्ये दशपर्णी अर्क, जीवामृत, ब्रम्हास्त्र, लसूण-मिरची अर्क, तसेच इतर नवनवीन उपाय योजनांची माहिती दिली. माजी संचालक डॉ. अडसूळ यांनी सेंद्रिय शेतीमध्ये कंपोस्टींग म्हणजे काय, कंपोस्टींगच्या विविध पद्धती व कंपोस्ट वापरण्याची पध्दती विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर संग्राम पाटील कृषी विज्ञान बोरगांव यांनी सेंद्रिय शेतीमधील पिक संरक्षण, किडींची ओळख, जीवनक्रमानुसार त्यांचा उपद्रव्य कसा टाळावा या विषयी मार्गदर्शन केले.
प्रगतीशील शेतकरी कांतीलाल नलगे यांनी सेंद्रीय शेतीमधून ऊस पिकातून एकरी 3 लाख रुपयांचा नफा कसा पध्दतीने मिळातो, त्यासाठी ते स्वत: करत असलेले नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांना समजावून सांगितले. यावेळी प्रकल्प उपसंचालक विजयकुमार राऊत, अंकुश सोनवले, प्रशांत नायकवडी, जयेंद्र काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजयकुमार राऊत यांनी आभार मानले.
Published on: 30 August 2018, 06:25 IST