वाशिम: रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतीचा पोत बिघडला आहे. विषमुक्त अन्न ही आज काळाची गरज झाली आहे. शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न वाढविण्यासोबतच त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी वाशिम येथे सेंद्रीय मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यात जास्तीत जास्त सेंद्रीय उत्पादक शेतकरी गट तयार करण्यासाठी सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
अनसिंग येथील राजाभाऊ इंगळे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना म्हणाले, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत बीज प्रक्रिया सयंत्र मिळाले आहे. या सयंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे धान्य जागेवरच स्वच्छ करून देण्यात येत असल्याने शेतमालाला दीडपट भाव मिळत आहे आणि मला रोजगार सुध्दा उपलब्ध झाला आहे. हे केवळ शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमुळेच शक्य झाले आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची विनंती त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली असता मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला निश्चितच प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले. श्री. इंगळे पुढे की, सेंद्रीय शेतीमुळे विषमुक्त पाणी, विषमुक्त धान्य आणि विषमुक्त वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.
मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील शेतकरी परमेश्वर झनक मुख्यमंत्र्यांशी बोलताना म्हणाले, मी काही वर्षांपासून सेंद्रीय शेती करीत आहे. आमची शेतकरी उत्पादक कंपनी असून जवळपास 250 शेतकरी या कंपनीशी जोडले आहेत. यातील 50 शेतकऱ्यांनी सन 2016-17 या वर्षात 50 एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेती केली. आता सेंद्रीय शेतीचे क्षेत्र 350 एकर इतके झाले आहे. उडीद, मुग, चवळी, तूर व भाजीपाला पिके आम्ही घेत आहोत. कृषी विभागाच्या पुढाकाराने व मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
वाशिम तालुक्यातील धुमका येथील प्रगतशील शेतकरी अनिल धुळे यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळे मिळाल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. मागील वर्षी गावाशेजारील धरणात पाणी नसल्यामुळे डाळिंबाची बाग जगविणे कठीण झाले होते. मात्र सामूहिक शेततळे मिळाल्यामुळे या शेततळ्यातील पाण्याचा वापर डाळिंबाची झाडे वाचविण्यास झाल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. माझ्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकरी पपईची लागवड करतात, मात्र पपईला फळपीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे जर पपईचे नुकसान झाले तर शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे पपई पिकाचा समावेश फळपीक विमा योजनेत करावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी केली असता मुख्यमंत्र्यांनी लवकरच कृषी विभागाशी बोलून पपई पिकाचा समावेश फळपीक विमा योजनेत करण्याची ग्वाही त्यांना दिली. नाफेडला 29 मे 2018 ला हरभरा विकला, परंतु आजपर्यंत विकलेल्या हरभऱ्याचे पैसे मिळाले नसल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून देताच मुख्यमंत्र्यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगून त्वरित पैसे देण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
मानोरा तालुक्यातील म्हसनी येथील रेशीम शेती करणारे शेतकरी रवींद्र पंडित यांनी जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. प्रत्येक रेशीम उत्पादक शेतकऱ्याच्या घरी रेशीम धागा काढण्याचा कारखाना असला पाहिजे, तसेच बँकांनी शेड बांधण्यासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, निश्चितच रेशीम शेतीला चालना देण्यात येईल. कारण या शेतीतून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. वर्षातून तीनदा रेशीम पीक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतो. म्हणून जिल्ह्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या शेतीकडे वळविण्यासाठी निश्चितच पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
‘लोकसंवाद’ कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मानोरा तालुक्यातील देऊरवाडी येथील तुळशीराम ढोके, वाशिम येथील रवी भोयर, कोंडाळा महाली येथील कैलास डाखोरे, व्याड येथील जगन बोरकर, वनोजा येथील गणेश कुरवाडे यांनीही सहभाग घेतला.
Published on: 15 January 2019, 05:50 IST