मुंबई
मणिपूरमधील दोन महिलांना नग्न करुन धिंड काढलेला व्हिडीओ व्हारयल झाला आहे. त्यानंतर संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात देखील याचे पडसाद चांगलेच उमटले आहेत. तसंच विरोधकांनी मणिपूरमधील हिंसाचाराबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे वेळ मागितला होता. पण, अध्यक्षांनी त्यांना वेळ न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
"मणिपूरमध्ये घटलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेबाबत आम्ही विधानसभेत आवाज उठावला असता आम्हाला बोलू दिलं गेलं नाही. तसंच घडलेल्या घटनेबाबत विधीमंडळाच्या माध्यमातून याबाबत एक ठराव झाला पाहिजे. संबंधित पिडीत महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. यांसदर्भात ठराव व्हावा, अशी आम्ही भावना व्यक्त केली. पण आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी पाच मिनिटे सुद्धा बोलायची संधी दिली नाही" अशी माहिती आमदार वर्षा गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, विधानसभेनंतर विधान परिषदेत देखील आमदारांना मणिपूर घटनेवर बोलण्याची परवानगी नाकारण्यात आली. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "कारण नसताना गोंधळ घालू नका. ती घटना संतापजनक आहे. न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या घटनेची दखल घेतली आहे. त्यामुळे मी या ठिकाणी चर्चेला परवानगी देत नाही."
Published on: 21 July 2023, 12:55 IST