महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेच्या उद्दिष्टांचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यात भाजीपाला बियाण्यांच्या चांगल्या जाती व उत्कृष्ट प्रकारच्या रोपे यांची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार तसेच कीड तसेच रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
या रोपवाटिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करून शेतीपूरक व्यवसायाच्या संधी चालून येतील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील सातमाने येथे केले. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दत्तक घेतलेल्या सातमाने गावातील यशवंत अग्रो हायटेक नर्सरीचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेस राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारणी करणे या योजनेद्वारे बंधनकारक करण्यात आले आहे.
या योजनेच्या माध्यमातून भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडमुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे तसेच पीक रचनेत बदल घडवून आणून नवीन तंत्र याचा वापर करणे, शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे हा उद्देश नसून तो नक्कीच सफल होईल असा विश्वासही दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे तसेच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on: 12 November 2020, 04:20 IST