News

मुंबई: राज्यात जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून यामध्ये 5 कोटी 13 लाख तुतीच्या रोपांची (रेशीम) लागवड होणार आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीबरोबर रोजगाराची संधीही मिळणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Updated on 09 July, 2019 9:32 AM IST


मुंबई:
राज्यात जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून यामध्ये 5 कोटी 13 लाख तुतीच्या रोपांची (रेशीम) लागवड होणार आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीबरोबर रोजगाराची संधीही मिळणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, दुग्ध आणि कुक्कुटपालन व्यवसायासारखाच रेशीम शेती हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते.

तुतीस एप्रिल, मे महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून ते जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो हे लक्षात घेऊन वृक्षारोपण कार्यक्रमात तुती लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

रेशीम संचालनालय “महारेशीम अभियान” राबवत आहे. त्यातून जास्तीत जास्त तुती लागवड व्हावी, असे आमचे प्रयत्न असून त्यादृष्टीने लोकांना प्रेरित, उद्युक्त आणि प्रोत्साहित करण्यात येत आहे. वन विभागाने तयार केली तुतीची रोपे सन 2019 मधील वृक्षारोपणात 5 कोटी 13 लाख तुती लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. रेशीम संचालनालय इतक्या मोठ्या संख्येने तुतीची रोपे तयार करू शकणार नाही. त्यांना असलेली मर्यादा विचारात घेऊन सामाजिक वनीकरण विभागाने तुतीची रोपे तयार करण्याची जबाबदारी उचलली आहे.

सामाजिक वनीकरण विभागाकडून 1.72 कोटी रोपे रेशीम संचालनालयास दिली जातील व त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांना रेशीम संचालनालय आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘रेशीम’ रोपांच्या अर्थात तुतीच्या लागवडीचे उद्दिष्ट राज्यात पूर्ण केले जाईल असा विश्वास वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

English Summary: Opportunities for employment of farmers through the cultivation of five million mulberry seedlings
Published on: 09 July 2019, 09:28 IST