नवी दिल्ली: वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीरचा ‘सेंद्रीय खपली गहू’ राजधानी दिल्लीत आयोजित ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये विक्रीसाठी आणण्यात आला आहे. यासह सेंद्रीय (Organic) पद्धतीने तयार केलेले बंसी गहु, तांदुळ, हळद, डाळी, मसाले, तेलबिया, चिप्स, बॉडी लोशन, लीप बाम, कपडे, गृह सजावटीच्या वस्तु ऑरगॅनिक मेळयात प्रदर्शित केलेल्या आहेत. या फेस्टिव्हलचे उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी यांनी केले.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’ चे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात आले. या मेळ्याची सुरूवात आजपासून झाली असून या मेळ्यात 250 पेक्षा अधिक महिला उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील महिला उद्योजकांचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबादमधून सानंद फूडच्या आरती डुघ्रेकर या आल्या आहेत. त्यांच्या दालनात तूर, मूग, चणा, उडीद डाळ, हळद, लाल मिरची पावडर आहे. राज्यातील सेंद्रीय शेती करणारे अनेक शेतकरी समूह त्यांच्यासोबत जोडलेले आहेत. दिल्लीमध्ये येण्याचे त्यांचे पहिले वर्ष असून सेंद्रीय शेती करणाऱ्यांना या माध्यमातून संधी मिळू शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यासह राज्यातील नंदुरबार, जळगाव, नागपूर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बीड, मुंबईसह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसिएशन ऑफ ऑरगॉनिक फार्मर्स यांचीही दालने या ठिकाणी आहेत.
या मेळ्यात सहभागी झालेल्या महिला उद्योजक देशातील सर्वच राज्यांमधील ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेल्या आहेत. ऑरगॅनिक वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन मिळावे, महिलांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी या मेळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना सबलीकरणाला मदत करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री श्रीमती गांधी यांनी यावेळी केले. हे प्रदर्शन 4 नोव्हेंबरपर्यत राहणार आहे. हे प्रदर्शन नि:शुल्क आहे.
Published on: 28 October 2018, 06:34 IST