Nashik News :
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (दि.२०) बेमुदत संप व्यापाऱ्यांनी पुकारला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचे ठरवले आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह इतर १७ बाजार समिती आणि उपबाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता पुन्हा अडचणीत आलेत. ऐन सणासुदीत व्यापाऱ्यांनी संप केल्याने आगामी काळात शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवदेनानुसार कांदा व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक केली. पण या बैठकीत कोणत्यांही मागण्यांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमध्ये आज व्यापाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. यामुळे दररोज ४० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
व्यापाऱ्यांच्या काय आहेत मागण्या?
१) बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये.
२) ग्राहकांना रेशन मार्फत खरेदी केलेला कांदा द्यावा.
३) कांद्यावर लादलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे.
४) संपूर्ण देशात विक्रेत्याकडून चार टक्के आडत घ्यावी.
५) देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी.
६) बाजारभाव वाढल्यानंतर चौकशी करू नये.
Published on: 20 September 2023, 11:01 IST