Nashik Onion Update News
केंद्र सरकारने अचानक निर्यातशुल्क लागू करताच कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारला. पण आता व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. सोलापूर बाजार समितीत कांदा लिलाव देखील सुरु करण्यात आले आहेत.
नाशिकसह राज्यातील इतर बाजार समितीतील कांदा लिलाव उद्यापासून सुरु होणार आहेत. केंद्र सरकार २ लाख टन कांदा खरेदी करणार असून शेतकऱ्यांना २ हजार ४१० प्रतिक्विंटल भाव देणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे.
सध्या बाजारात आवक घटली आहे. तर दरात काहीशी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मध्यम दर्जाच्या कांद्याला १८०० ते २३०० दर मिळत आहे. तर उत्तम दर्जाच्या कांद्याला २५०० ते २९०० रुपये दर मिळत आहे.
नाशिकमधील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कार्यालयात सभापती, संचालक आणि कांदा व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार देखील उपस्थित होत्या.
दोन लाख टन कांदा खरेदी करणार - पवार
"आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून २ लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. तसेच या कांद्याला २ हजार ४१० प्रतिक्विंटल भावही शेतकऱ्यांना देण्यात येईल," अशी घोषणा करतानाच शेतकऱ्यांनी बाजार समित्या खुल्या करून खरेदी-विक्री सुरू करण्याचे आवाहन भारती पवार यांनी केलं.
Published on: 23 August 2023, 03:29 IST