शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले. कांदा काढणीनंतर साठवणुकीसाठी प्रचंड प्रमाणात खर्च करून शेतकऱ्याने पाच महिने चाळीत साठवून ठेवला. जेणेकरून बाजारात चांगला दर मिळू लागला तर आपण बाजारात कांदा विकायचा अशी भोळी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले असून उन्हाळी कांद्याला अवघा तीन रुपये ते सहा रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे अवघड झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
सर्वाधिक उन्हाळी कांद्याचे उत्पादन हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात होते. मागच्या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. पिकलेला कांदा शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवला, पण आता त्याच कांद्याला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. यावर्षी उन्हाळ कांद्याचे बियाणे दहा हजार रुपये पायली प्रमाणे विकत घ्यावी लागत आहे. एका पायलीत एक एकर इतकी लागवड होत असते. कांद्याचे रोप तयार होण्यासाठी दीड महिना लागतो, त्यानंतर शेतात तयार करणे, खत देणे व त्यानंतर कांदा लागवडीसाठी एकरी दहा हजार मजुरी द्यावी लागते. तितकीच मजुरी कांदा काढण्यासाठी द्यावी लागते.
साठवलेल्या कांद्याची उष्णता आणि पाऊस यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. साठवलेल्या कांद्याचे वजन घटले त्यानंतर यावर्षीच्या शेती व घर खर्च भागवण्यासाठी शेतकरी टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात विकायला आणत आहे. कांद्याला साडे तीनशे ते सहाशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा पिकावर झालेला खर्चही निघणे अवघड झाले आहे, त्यातच काही दिवसानंतर लाल कांदा बाजारात येईल त्यामुळे उन्हाळी कांद्याची मागणी घटणार असल्याने शेतकऱ्याला हा कांदा विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिले गेले, पाहिजे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Published on: 03 August 2020, 04:33 IST