नाशिक: राज्यात सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या मोसम खोऱ्यात (बागलाण) कांदा हा बेभरवशाचा असल्याने "कांद्यावर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये" ही म्हण विशेष प्रचलित आहे. आता पुन्हा एकदा कांद्याच्या बेभरवशाचा प्रत्येय समोर आला आहे. सध्या देशांतर्गत मागणीपेक्षा अधिक कांदा बाजारपेठेत दाखल होत आहे यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याच्या लिलावासाठी विशेष ओळखली जाते. कांद्यासाठी ही एपीएमसी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून परिचयाची आहे विशेष म्हणजे याच कृषी उत्पन्न बाजार समिती मधून देशातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे दर ठरत असतात असा समज आहे. एकंदरीत लासलगाव एपीएमसी कांद्यासाठी प्रमुख सूत्रधार बाजारपेठ आहे.
याच एपीएमसीमध्ये गेल्या पंधरा दिवसात कांद्याच्या दरात एक हजार रुपयांची घसरण बघायला मिळाली. सध्या मिळत असलेल्या कांद्याच्या दरात उत्पादन खर्च काढणे देखील मुश्कील असल्याने शेतकरी बांधवांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे निर्माण होऊ शकते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये नवीन लाल कांद्याची आवक वाढली असून राज्यातील नासिक नगर पुणे सोलापूर या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नवीन उन्हाळी कांदा येऊ लागल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण बघायला मिळत आहे.
कांदानगरी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव एपीएमसी मध्ये सध्या 900 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विक्री होत आहे. 5 मार्च रोजी 1900 रुपये प्रति क्विंटलहून अधिक दराने विक्री होणारा कांदा सध्या 900 रुपये प्रति क्विंटल वर आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
लासलगाव एपीएमसी मध्ये सकाळच्या लिलावासाठी सुमारे अकराशे वाहने आली होती. यातून जवळपास 17 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यावेळी जास्तीत जास्त जर 852 रुपये असून सर्वसाधारण दर 650 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला.
कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असल्याने लासलगाव एपीएमसी लवकरच केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचे माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुवर्णा जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे कांद्याच्या दराबाबत काही तोडगा निघतो का हे विशेष बघण्यासारखे राहील.
संबंधित बातम्या:-
*मानलं भावा! "या" नवयुवक शेतकऱ्याने अवघ्या 12 गुंठ्यात कमवले 4 लाख; वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा*
Published on: 23 March 2022, 11:21 IST