महाराष्ट्रात यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती खुपच बिकट बनली आहे. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे, सरकारच्या धोरणामुळे, व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे पुरते वाटोळे झाले आहे. याचेच एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे, हि घटना व्यापारी व आडत्यांचा मनमानी कारभार उजागर करते. सोलापूर मध्ये एका शेतकऱ्याने 1123 किलो कांदा विकला पण त्याला याबदल्यात फक्त 13 रुपये मोबदला मिळाला.
सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असताना हि घटना समोर आली आहे त्यामुळे कांदा उत्पादक संघटना, शेतकरी नेते आणि शेतकरी याचा निषेध व्यक्त करत आहेत आणि हा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही असे मत व्यक्त करत आहेत. तर कमिशन एजेंट ने दावा केला की, कांद्याची गुणवत्ता हि खुप खराब होती आणि त्यामुळे या कांद्याला एवढा कमी भाव देण्यात आला.
सोलापूर मध्ये बापु कावडे नामक शेतकऱ्याने आपला कांदा हा एका आडत्याला विकला, बापुने 1123 किलो कांदा विकला आणि त्याला याबदल्यात 1665.50 रुपये मिळाले यामध्ये त्याला वाहनभाडे, हमाली, तोलाई असा एकंदरीत 1651 रुपये खर्च आला, म्हणजे खर्च काढून ह्या शेतकऱ्याला फक्त 13 रुपयाची कमाई झाली.
त्यामुळे हि घटना सर्वदूर पसरली आणि याचा अनेक शेतकरी नेत्यांनी विरोध केला. जर अशीच परिस्थिती राहिली तर सरकारचे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न कसे पूर्ण होईल हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
स्वाभिमानी नेते राजू शेट्टी यांनी ट्विटर वर शेअर केली बिल पावती
बापु कावडे यांची कांदा विक्रीची बिल पावती स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे नेते व माजी लोकसभा खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर सार्वजनिक केली, तेव्हापासून हि घटना प्रसारमाध्यमात चर्चेचा विषय बनली आहे.
शेतकरी या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत, शिवाय सरकारवर शेतकरीविरोधी असल्याचा आरोप देखील करत आहेत. राजू शेट्टी यांनी ट्विटर हि पावती शेअर करत ट्विट केले की, या 13 रुपयांचे कोणी काय करणार? हे अस्वीकार्य आहे. शेतकऱ्याने त्याच्या शेतातून 24 पोती कांदे कमिशन एजंटच्या दुकानात पाठवले आणि त्याबदल्यात त्याला फक्त 13 रुपये मिळाले."
Published on: 05 December 2021, 03:21 IST