राज्यात सर्वत्र कांद्याची मोठी विक्रमी आवक होत आहे, विशेषता पश्चिम महाराष्ट्रातील पुणे नाशिक सोलापूर तसेच दुसऱ्या कांदा उत्पादक राज्यात देखील मोठी आवक बघायला मिळत आहे. या वाढलेल्या आवकेमुळे कांद्याच्या दरात मोठी कपात होत असल्याचे जाणकार लोक माहिती देत आहेत. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पुणे जिल्ह्यात देखील काही ची अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. जिल्ह्याच्या चाकण एपीएमसी मध्ये शनिवारी या हंगामातील उच्चाँकी आवक नमूद करण्यात आली. 5 तारखेला शनिवारी या एपीएमसीमध्ये तब्बल 20 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे कांद्याच्या दरात मोठी कपात झाली सध्या चाकण एपीएमसीमध्ये निर्यातक्षम गावरान कांद्याला 1000 रुपये प्रतिक्विंटल पासून ते अठराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या बाजार भावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल होणार असल्याचे सांगितले जात आहे. सरकारने जर लवकरात लवकर ठोस कांदा निर्यात धोरण आखले नाही तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधींचे आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कांदा निर्यात करण्यास अडचणी येत असल्याचे निर्यातदार कंपन्यांकडून सांगितले जात आहे. चाकण एपीएमसी मध्ये दाखल होणारा कांदा पूर्णता निर्यातक्षम असून या कांद्याची आखाती देशात निर्यात होण्याची आवश्यकता आहे. कोलंबो तसेच मलेशिया सारख्या आखाती देशात या गावरान कांद्याला विशेष मागणी असून सरकारने याबाबत लवकरात लवकर ठोस धोरण आखावे अशी मागणी यादरम्यान निर्यातदार कंपनी तसेच कांदा उत्पादक शेतकरी करताना बघायला मिळत आहेत.
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पावसाळी कांदा या हंगामात उशिरा बाजारपेठेत दाखल झाला. त्यामुळे ज्या काळात कांद्याची मागणी होती त्या काळात कांदा विक्रीसाठी उपलब्ध झाला नाही. पावसाळी कांदा नेहमीच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विक्रीसाठी येत असतो मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे या हंगामात पावसाळी कांदा जानेवारी महिन्यात चमकला. आता बाजारपेठेत उन्हाळी कांदा नजरेस पडत आहे, हा गावरान कांदा आल्याने कांद्याच्या दरात घट झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी 3000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होणारा कांदा सध्या केवळ अठराशे रुपये प्रति क्विंटल एवढा विक्री होत आहे. तसेच गोल्टी, चिंगळी, बेले कांदा पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढाच विक्री होत आहे. या बाजारपेठेतील चित्रामुळे कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.
Published on: 06 March 2022, 11:13 IST