मुंबई
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ (Onion Rate Hike) होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या दरात वाढ झाल्यास कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे.
सध्या कांद्याला बाजारात २० ते ३० रुपये किलोचा दर मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात यात दरवाढ होऊन दर दुप्पट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली आहे.
नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये सध्या कांद्याचे घाऊक भाव ५ रुपये प्रति किलो ते २४ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे २५ ते ३५ रुपये प्रति किलो वर गेले आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार
नवी मुंबई बाजार समितीत कांद्याचे दर वाढू लागले आहेत. १५ ते २० किलो असणाऱ्या कांद्याचा किमत आलेख वर चढू लागला असून ३० रुपये किलोवर कांदा पोहचला आहे. त्यामुळे कांदा महाग होणार का? अशी चर्चा आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांना दरवाढीमुळे सुगीचे दिवस येणार आहेत.
Published on: 11 August 2023, 10:40 IST