Nashik News : दिवाळी सणात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह इतर बाजार समित्या बंद राहणार असल्याचे मॅसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने घरात नरमाई आली आहे. कांदा दरात ८०० ते ९०० रुपयांची नरमाई झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत.
केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य ८०० डॉलर प्रति टन केले आहे. त्यामुळे कांदाच्या दरात घसरण सुरु झाली आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती दिवाळीनिमित्त ९ ते १८ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बाजारात आवक वाढून दरात नरमाई आली आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा दरात सरासरी ८०० ते ९०० रुपये नरमाई आली आहे. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत दररोज एक लाख क्विंटल कांद्याची आवक होत आहे. गेल्या पाच दिवसात पाच लाख क्विंटल मागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साधारण ३५ ते ४० कोटी रुपयांचा तोटा बसल्याचे दिसून आले आहे.
मागील काही दिवसांपासून कांदा आवकेत घट झाल्याने चांगला दर मिळत आहे. देशभरातील अनेक ठिकाणी ७० ते ८० रुपये किलो दराने कांदा विक्री केली जात आहे. तसंच आगामी काळात हेच दर १०० रुपये किलोपार जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे हे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु आहेत.
दरम्यान, वाढलेल्या कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून २ लाख मॅट्रिक टन कांदा किरकोळ बाजारात विक्रीसाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६ शहरांमध्ये कांदा विक्री देखील सुरु झाली आहे. हा कांदा २५ रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे त्यांचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे.
Published on: 02 November 2023, 03:21 IST