सध्या झालेली अतिवृष्टी, मागील वर्षाचा उन्हाळी कांद्याचा संपत असलेला साठा आणि नवीन कांदा येण्यास लागणारा उशीर यामुळे कांद्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे कांद्याचे दर किरकोळ बाजारात गगन भरारी घेताना दिसत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याचे दर हे सरासरी ४० ते ७० रुपयांवर गेला असून किरकोळ मार्केटमध्ये कांदा ६० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. लवकरच हा दर शंभरी पार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागणीपेक्षा पुरवठा असल्याकारणाने बाजार भाव वाढत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी ७०५ टन कांद्याची आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये ४० ते ७० रुपयांनी त्याची विक्री होत होती.
भारतातील सगळ्यात मोठे कांद्याचे बाजार पेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याचे दर ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला आहे. साधारणतः असे म्हटले जात आहे की, कांद्याचे भाव अशाच पद्धतीने वाढत राहिले तर दिवाळीच्या कालावधीमध्ये कांदा फारच महाग होऊ शकतो. व्यापाऱ्यांचा म्हणणे आहे की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर किरकोळ बाजारात शंभर रुपयाच्या पार पोचतील.
कांदा महाग का होत आहे?
भारतातील सगळ्यात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रामधील लासलगाव येथे ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटल कांद्याचे भाव पोहोचले आहेत. यामागे महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये काही दिवसांपासून होत असलेली अतिवृष्टी. या अतिरिक्त पावसामुळे जे कांदा पीक शेतामध्ये होतं ते सगळे खराब होऊन त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे प्रमुख कारण कांद्याच्या भाववाढी मागे सांगता येईल.
व्यापार्यांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी कांदा साठवणे चालू केलेले आहे. नवीन कांदा पीक आता फेब्रुवारीमध्ये येईल तोपर्यंत कांद्याच्या किमती कमी होणार नाहीत असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दुसरे कारण म्हणजे कांद्याच्या किमती या हॉटेल आणि सर्व प्रकारचे रेस्टॉरंट सुरू झाल्यामुळे ही वाढल्याचे लक्षात येत आहे. मागणी वाढत असल्या कारणाने कांद्याच्या किमती वाढत आहेत. १४ ऑक्टोबरला कांदा व्यापाऱ्यांवर इन्कम टॅक्स विभागाची कारवाई झाली होती. त्यानंतर व्यापारी मार्केटमध्ये लिलावासाठी येत नव्हते. त्यामुळे कांदा व्यापार हा सर्व प्रकारे ठप्प झाला होता. परंतु सोमवारी मार्केट उघडल्यानंतर कांद्याच्या भावाने ते दोन हजार रुपयांपर्यंतची वाढ नोंदवली गेली.
कांदा भाव वाढ होण्यामागे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये बिगर मोसमी पाऊस जास्त झाल्याकारणाने तिथले ही कांदा उत्पादन हे कमी प्रमाणात आले आहे. त्याचा सरळ परिणाम भाग कांद्याच्या किमती वाढल्यावर झाला. भारतामध्ये तिन्ही हंगामात कांदा लागवड केली जाते. पहिला खरीप हंगाम, रब्बी हंगाम आणि उन्हाळी या तीन गावांमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. खरीप हंगामात लागवड केलेला कांदा ऑक्टोबर ते डिसेंबर मध्यापर्यंत मार्केटमध्ये येतो. दुसऱ्या हंगामामधील लागवड ही ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये केली जाते. साधारणतः मार्चपर्यंत तो कांदा बाजारात येतो. आकडेवारीनुसार कांद्याचे एकूण उत्पादनापैकी ६५ टक्के उत्पादन हे रब्बी हंगामात होते.
Published on: 20 October 2020, 04:39 IST